

Five killed in a three-way collision involving a car, a two-wheeler, and an ST bus on the Amalner-Dhule road
जळगाव : पुढारी वृत्तसेवा एसटी-मोटरसायकल-कार या तिहेरी अपघातात पाच जण ठार झाल्याची घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास अंमळनेर-धुळे रस्त्यावर मंगळूरच्या पुढे हॉटेल वृंदावन जवळ घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केले आहे. गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
मोटरसायकल क्रमांक एम. एच. 18 सी 8719 आणि एसटी बस क्र. एम एच १३ सी यु 75 40 ही वाहने अमळनेरकडून धुळ्याकडे जात होती. यावेळी समोरून धुळ्याकडून येणारी कार जीजे 19 ए एफ 3147 यांची एसटी आणि मोटरसायकलला जोराची धडक बसली. या भीषण अपघातात मोटरसायकलचा चेंदा-मेंदा होऊन धरणगाव येथील मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला, तर चारचाकीतील महिला व पुरुष असे एकूण पाचजण जागीच ठार झाले.
गुजरात येथील आदित्य चंद्रकांत महाजन अनिता सुरेश महाजन निर्मला नंदलाल महाजन नंदलाल गोपाल महाजन सुरेश विक्रम महाजन हे साखरपुड्यासाठी अंमळनेर येथे येत होते. या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, कैलास शिंदे, रवी पाटील, पोलीस पाटील भागवत पाटील हे घटनास्थळी उपस्थित झाले.
जखमींना रुग्णालयात तात्काळ भरती करण्यात आली. यावेळी मंगळूरच्या गावकऱ्यांनी पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे रवाना करण्यात आले असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.