

नागपूर - पंढरपूर आणि अक्कलकोट येथील दर्शन आटोपून नागपूरकडे परतणार्या भाविकांच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना वर्धा येथील सावंगी बायपास महामार्गावर घडली.
ऍड.किशोरी प्रदीप उके (४९) आणि मोनाली निलेश मेश्राम (३७) दोन्ही रा. नागपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर चालक तुषार लक्ष्मण जाधव (३७), तनीष चंद्रशेखर उके (६), निता अनिल बारसकर (५५), दिव्यांशी निलेश मेश्राम (१०), आराध्य संतोष उके (१३), ईशान्य अनिल बारसकर (१७), साधना अनिल बारसकर (५६), कांचन चंद्रशेखर उके (४२) सर्व रा. नागपूर हे जखमी झाले असून यातील ५ जण गंभीर असल्याची माहिती आहे.
नागपुरातील काही भाविक देव दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर ते चारचाकी वाहनाने नागपूरकडे परतत असताना वर्धा जिल्ह्यातील सावंगी बायपास परिसरात चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळले. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या भीषण अपघातात वाहनातील दोन किशोरी उके आणि मोनाली मेश्राम यांचा जागीच मृत्यू झाला. आठपैकी पाच जण गंभीर जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस व मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. हा अपघात नेमका कशामुळे झाला, चालकाला डुलकी लागली होती का, वाहनाचा वेग अधिक होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.