

Dhule Case Registered Deceased Drivers
धुळे : धुळे शहरालगतच्या लळींग घाटात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मयत डंपर चालक आणि आराम बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच 41 एयू 2495 क्रमांकाचा रेतीने भरलेला डंपर धुळेहून मालेगावकडे जात होता. डंपरने चुकीच्या मार्गिकेत प्रवेश केल्याने समोरून येणाऱ्या एमएच 12 एक्सएम 1270 क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपर चालक योगेश पंडित मंडलिक (रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच टोल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, त्याचवेळी मालेगावकडून येणारी एआर 11 डी 8585 क्रमांकाची आराम बस अपघातग्रस्त ट्रकवर आदळली. या दुर्दैवी घटनेत मदतकार्य करणारे टोल कर्मचारी मनोज प्रकाश नरवाळ (रा. टोकडे, ता. मालेगाव) आणि गणेश हिरामण थोरात (रा. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बस चालक जावेद खान जहांगीर खान याचाही मृत्यू झाला.
या अपघातात बसमधील गुल मोहम्मद मुजाबुद्दीन शेख आणि अमीर सगीर कुरेशी यांचाही मृत्यू झाला. एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून 26 जण जखमी झाले आहेत. जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृतांपैकी तिघांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करावे लागले. नंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.
या प्रकरणी टोल कर्मचारी भावेश संजय फरताडे यांच्या फिर्यादीवरून मयत डंपर चालक योगेश पंडित मंडलिक आणि मयत आराम बस चालक जावेद खान जहांगीर खान यांच्याविरोधात मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.