

Fatal potholes, danger of accidents while turning from underpass near Tarsod to parallel road leading to Bhusawal
जळगाव : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते आणि पुलांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (न्हाई) कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बायपासवरील आरओबी नादुरुस्त झाल्यानंतर संपूर्ण वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली. या वाहतूक बदलामुळे शहरात झालेल्या अपघातांमध्ये पाच नागरिकांना नाहक जीव गमवावा लागल्याचा आरोप होत असतानाही संबंधित यंत्रणेची उदासीनता कायम असल्याचे चित्र आहे.
याचाच प्रत्यय आता तरसोदजवळील अंडरपास परिसरात येत आहे. अंडरपासमधून भुसावळकडे जाणाऱ्या समांतर रस्त्यावर वळताना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून मोठा आणि जीवघेणा खड्डा पडलेला आहे. मात्र, या खड्ड्याकडे संबंधित ठेकेदार किंवा देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अभियंत्याचे अद्याप लक्ष गेलेले नाही का, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ज्या ठेकेदाराकडे या मार्गाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी आहे, त्याच ठेकेदाराने बांधलेल्या रस्ते व पुलांच्या दर्जाबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता रस्त्यावर पडलेला मोठा खड्डाही संबंधितांना दिसत नसल्याने अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात नेमके काय संबंध आहेत? त्यांना कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मुख्य महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरही दुरवस्था
तरसोद येथील समांतर रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर येण्यासाठी मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या ठिकाणी आवश्यक डांबरीकरणही करण्यात आलेले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे आणि धुळीतून मार्ग काढत मुख्य महामार्गावर प्रवेश करावा लागत आहे. लहान वाहनांपासून मोठ्या वाहनांपर्यंत सर्वांनाच या ठिकाणी मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
जबाबदार अभियंता फोनच उचलत नसल्याचा आरोप
तरसोद ते फागणे या मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या संबंधित अभियंत्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते फोन उचलत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे रस्त्यावरील गंभीर समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवायची तरी कशी, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान, याबाबत न्हाई चे उपकार्यकारी संचालक साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तरसोदजवळील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत विचारणा केली असता, “लवकरात लवकर सदर खड्डे बुजविण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, संबंधित अभियंता फोन उचलत नसल्याच्या तक्रारीबाबत त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
अपघाताची वाट पाहिल्यानंतरच दुरुस्ती होणार का?
महामार्गावरील एखादी समस्या तातडीने दूर करण्याऐवजी ती दीड-दोन महिने तशीच ठेवली जाते आणि नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन दिले जाते, अशी नागरिकांची भावना आहे. खड्डा बुजविण्यासाठी आणखी एखादा अपघात होण्याची किंवा जीवितहानी होण्याची प्रतीक्षा केली जात आहे का? असा संतप्त सवालही आता उपस्थित होत आहे.
रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदारावर न्हाईचे संबंधित अधिकारी प्रभावी नियंत्रण ठेवतात का, कामाच्या गुणवत्तेची तपासणी नियमितपणे होते का आणि तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाते का, याची चौकशी होण्याची गरज आहे.