

Chitra Wagh on Congress
मुंबई : "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विकास हा केवळ तुष्टीकरणाचे राजकारण करणाऱ्यांच्या डोळ्यात खुपतोय. देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देऊन मीडियात झळकायचे, हीच आता काँग्रेसची नवी ओळख बनली आहे," अशी एक्स पोस्ट करत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अशा शब्दांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांना उत्तर दिले.
चित्रा वाघ यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राज्यातील महायुती सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने विकासाची कामे केली आहेत, ती पाहून विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक सध्या पूर्णपणे घाबरलेले असून, त्यांच्याकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला काहीही उरलेले नाही. त्यामुळेच ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत.
"सतत महिलांचा आणि हिंदूंचा अपमान करण्याची वृत्ती महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी महापुरुषांचा किंवा हिंदू धर्माचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी (दि. १०) ठाण्यात माध्यमांबरोबर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस हे बदल्यांमधून पैसे घेतात, ते देवा भाऊ नसून टक्का भाऊ तसेच मेवा भाऊ आहेत.