

जळगाव : अटक वॉरंट प्रकरणी एका आरोपीला अटक न करता वॉरंट रद्द करण्याची मुदतवाढ देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. यामधील ए एस आय याच्या सेवानिवृत्तीला दोन ते तीन वर्षे बाकी आहे व हेड कॉन्स्टेबल असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला सात ते आठ महिने बाकी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे विरुद्ध खामगांव न्यायालय येथे कलम 138 प्रमाणे चेक बाऊन्स ची केस दाखल आहे. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध कोर्टाने अटक वॉरंट काढले होते . सदर वॉरंट मध्ये अटक न करण्यासाठी व अटक वॉरंट कॅन्सल करण्याची मुदतवाढ देण्याचा मोबदल्यात यातील सहा. फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील व सहा फौजदार आत्माराम सुधाम भालेराव यांनी 5000 रुपये लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी ला.प्र विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे सहाय्यक फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील व आत्माराम सुधाम भालेराव, यांनी पंचा समक्ष 2000 रुपये लाचेची मागणी केल्याची निष्पन्न झाले. आज 22 रोजी सापळा रचला असता सहा फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील यांचे सांगणेवरून खाजगी व्यक्ती ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली यातील तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील चालक किशोर महाजन, बाळु मराठे, प्रदिप पोळ, भुषण पाटील, प्रणेश ठाकूर यांनी सापळा यशस्वी केला.
सदरचे दोन्ही कर्मचारी हे तालुका पोलीस स्टेशनला असून यामधील ए एस आय यांच्या सेवानिवृत्तीला दोन ते तीन वर्षे बाकी आहे व हेडकॉन्स्टेबल यांच्या निवृत्तीला सात ते आठ महिन्याचा कालावधी असताना त्यांना लाच घेताना अटक झाली आहे.
या कारवाईमुळे पोलीस खात्यामध्ये पुन्हा लाच घेण्याचे किंवा भ्रष्टाचार मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. पोलीस विभागातील दोन्ही कर्मचाऱ्यांना लाच लचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात येत आहे. यावरून स्पष्ट झाले आहे की ज्यांच्यावर कायदा व सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आहे तेच असे प्रकारे चिरीमिरी करून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.