

जळगाव: गणपती आणि पोळा सणासुदीने बाजारपेठा सजल्या असताना, नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ अन्न व औषध प्रशासनाने (FDA) उधळून लावला आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील 'चौधरी स्वीट्स अँड नमकीन' या दुकानावर धाड टाकून प्रशासनाने निकृष्ट दर्जाच्या मिठाईचा मोठा साठा जप्त केला आहे. सुमारे २४,१३० रुपये किमतीची ही मिठाई नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली.
जिल्ह्यात सणासुदीच्या काळात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, १९ ऑगस्ट रोजी शिरसोली येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या उत्पादनस्थळी छापा टाकण्यात आला.
तपासणीदरम्यान, दुकानात अत्यंत अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या ठिकाणी तयार होत असलेल्या पदार्थांचा दर्जा अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करणारा होता. यामध्ये पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गाठी पदार्थांचा समावेश होता. या मिठाईचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे आढळून आल्याने, प्रशासनाने नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. उर्वरित १५१ किलो मिठाई, ज्याची किंमत २४,१३० रुपये आहे, ती नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आली.
ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी के. ए. साळुंके यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी आकाश बोहाडे, योगराज सूर्यवंशी, आकांक्षा खालकर आणि पद्मजा कढरे यांचा समावेश होता.
"सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी कोणीही खेळ करू नये. जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ तयार करणाऱ्या किंवा भेसळयुक्त मालाची विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट इशारा सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. या कारवाईमुळे भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.