Jalgaon Crime: पोलिसांचा धाक उरलाय का? तडीपार आरोपींचा राहत्या घरीच मुक्काम, जळगावमधील धक्कादायक प्रकार
जळगाव : तडीपार केलेले आरोपी शहरात त्यांच्या घरात मुक्काम ठोकून असल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे. पेट्रोलिंगदरम्यान हा प्रकार समोर आला असला तरी एकंदिरतच शहरातील स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्यातील शोध पथकाच्या कार्यक्षमतेवर यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
जळगावात काही दिवसांपूर्वी विशाल उर्फ विकी रमेश मोची याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील आरोपी हे तडीपार होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे तेजस दिलीप सोनवणे आणि सागर ऊर्फ बीडी सुरेश सपकाळे हे आणि सध्या तडीपार आहेत. मात्र, २० ऑगस्टला संध्याकाळी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना माहिती मिळाली की, तेजस आणि सागर हे तडीपार आरोपी अजूनही राहत्या घरी वास्तव्य करीत आहेत. पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्यासह गणेशकुमार नायकर, दिपक गजरे, शशिकांत पाटील, गणेश ढाकणे, नवजीत चौधरी, काजोल सोनवणे यांच्या पथकाने तत्काळ रवाना होवून छापा टाकला असता आरोपी आपल्या घरात मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपार आरोपी स्वप्नील ऊर्फ गोल्या धर्मराज ठाकुर हा देखील शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत डी.एन.सी कॉलेज परिसरात गावठी पिस्तूलसह दहशत माजवित असताना मिळुन आला होता. त्याच्यावर विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

