जळगाव : शिरसोली गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक | पुढारी

जळगाव : शिरसोली गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील वराड गल्लीत शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना आज (दि. २८) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी व नागरिक जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवार (दि. २८) तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. या अनुषंगाने जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. गावातील इंदिरा नगरातून सायंकाळच्या सुमारास मिरवणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली होती. ही मिरवणूक रात्री ८ वाजता गावातील वराड गल्लीतील धार्मिक स्थळाजवळून जात असताना अचानक मिरवणूकीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या मिरवणूकीवर आचानक झालेल्या दगडफेकीत मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह ५ ते ६ पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे बबन आव्हाड यांच्यासह पोलीस पथक शिरसोली गावात दाखल झाले आहे. या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याचे काम सुरू केले आहे. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

Back to top button