

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
पाचोरा येथील बसस्थानक परिसरातील कापड दुकानास शनिवारी (दि. 5) मध्यरात्री दोन आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे ६० लाखांचे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील बसस्थानक रोडवर गणेश प्लाझा व्यापारी संकुल असून व्यापारी संकुलात राहुल मोरे यांचे मुद्रा एन. एक्स. या नावाचे कापड दुकान आहे. या दुकानात दिवाळी निमित्त मोठ्या प्रमाणावर रेडीमेड कापड विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. मात्र, पहाटेच्या सुमारास दुकानात आग लागल्याने आतून धुर येत असल्याचे रहिवाशी नागरिकास दिसून आले. संबंधित व्यक्तीने तत्काळ दुकानाचे मालक राहुल मोरे यांना फोनवरुन घटनेची माहिती कळवली. राहुल मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र अग्निशमन दलास घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे दुकानातील महागडे कापड आगीत जळून खाक झाले आहे. जवळपास ६० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.