जळगाव : पुढारी वृत्तसेवा
घरात साठवलेल्या कपाशीवरून वादाला तोंड फुटले असून, या किरकोळ वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार चांदसर (ता. धरणगाव) येथे घडला. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईदास माधवराव शिंदे (42, चांदसर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित साहिल आयुब पठाण, अयुब बाबन पठाण (दोघे. रा. चांदसर, ता. धरणगाव) यांनी कोळीवाडा भागातील घरामध्ये भरलेली कपाशी खाली करून घ्या, माझ्या आई-वडिलांना कपाशीचे रात्रभर किडे चावतात. त्यामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. तक्रारदाराने कपाशीला भाव आला की, विकून टाकू असे बोलल्याचा संशयित दोघांना राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दुसऱ्या गटातर्फे अयुब पठाण यांनी तक्रार दाखल केली आहे. यात भाईदास माधवराव शिंदे, मनोहर शिवदास शिंदे (दोघे रा.चांदसर, ता. धरणगाव) यांनी म्हटले की, तुम्ही माझ्या घराशेजारी कपाशी भरली आहे. कपाशीमध्ये किडे पडलेले आहेत. कपाशीतील किरकोडे नामक किडे आई-वडिलांना चावल्याने खाजेच्या जाचाने त्रस्त असून झोप होत नाही. असे बोलण्याचा राग आल्याने दोघा संशयितांनी शिविगाळ करून चापटाबुक्कांनी मारहाण करीत कपाशी घरातून काढणार नाही, जे करायचे ते कर अशी धमकी दिली. दरम्यान, दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारींवरून अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हवालदार विजय चौधरी करीत आहेत.