जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाज बांधव हे दोन किलो मटण आणि एका दारूच्या बाटलीवर मतदान करतात, असं वक्तव्य केल होतं. त्यामुळे खडसे यांचा जळगाव, चाळीसगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला. एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला चपला तसेच जोडे मारून संताप व्यक्त केला. तसेच खडसेंची प्रतिमा असलेल्या फलकाला लाथा मारून संतप्त भावना व्यक्त केल्या.
जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी यावेळी खडसेंच्या प्रतिमेला जोडे मोरो आंदोलन करीत आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. तसेच खडसे यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर बंजारा समाजबांधवांतर्फे शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रमक मोर्चा नेण्यात आला.
चाळीसगावला निषेध आंदोलन…
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी समस्त बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करून समाजाचा अवमान केलेला आहे. हा अवमान बंजारा समाज कधीही खपवून घेणार नाही आणि म्हणून एकनाथ खडसेंनी समाजाची जाहीर माफी मागावी, यासाठी १९ रोजी संध्याकाळी ५ वा. चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, नमोताई राठोड, भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, सांगवी गावाचे सरपंच डॉ. महेंद्रसिंग राठोड, लोंजे सरपंच भरत राठोड, जुनोने सरपंच गोरख राठोड, रोहन सूर्यवंशी, भास्कर पाटील, मनोज गोसावी, अयास पठाण, ममराज जाधव, विकास राठोड, दादाभाऊ चव्हाण, प्रशांत चव्हाण, प्रेम चव्हाण, राहुल राठोड, अशोक राठोड, ईश्वर चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.