

भुसावळ येथील दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातील कर्मचार्यांना दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची भूमिका महाजेनकोने घेतली. त्यानुसार महाजेनकोने घोषणा केल्याने प्रकल्पातील तब्बल 1100 कर्मचार्यांना लाभ मिळणार आहे. येथील संघर्ष समितीने दिवाळीपूर्वी सानुग्रह न मिळाल्यास आंदोलनाची नोटीस महाजेनको प्रशासनाला जारी केली होती.
दिवाळीपूर्वीच महाजेनकोने कर्मचार्यांना 16 हजार रुपयांचा सानुग्रह मंजूर केल्याने कर्मचार्यांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. दीपनगर केंद्रातील 950 कर्मचार्यांना 16 हजार, तर साधारण 150-200 मानधन तत्त्वावरील कर्मचार्यांना 10 हजारांचा सानुग्रह मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधानंतर तब्बल दोन वर्षांनंतर सर्वांमध्ये दिवाळीबाबत उत्साहाचे वातावरण आहे. अशा काळात महाजेनकोच्या कर्मचार्यांना 16 हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
25 हजार रुपये सानुग्रहाची होती मागणी…
याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व तिन्ही कंपन्यांतील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना प्रकाशगड (बांद्रा) येथे दि. 17 रोजी संघर्ष समितीमध्ये सहभागी 26 कामगार, अभियंते व अधिकारी यांच्या संघटना पदाधिकारी यांची बैठक झाली. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (वित्त) रवींद्र सावंत यांची भेट घेऊन संघटनांच्या संतप्त भावना ऊर्जा सचिवांपर्यंत पोहोचवावे ही मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. त्यांनी तत्काळ संचालक मानव संसाधन वितरण कंपनी यांच्यामार्फत संघटनांच्या सचिव दिनेश वाघमारे यांच्यापुढे मांडल्या होत्या. संघर्ष समितीमध्ये सहभागी सर्वच संघटनांच्या नेतृत्वाने 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे ही आग्रही मागणी केली होती.