नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात हेल्मेटसक्तीसाठी गुरुवार (दि. १)पासून शहर पोलिसांतर्फे विशेष मोहीम राबवली जात आहे. शहरात मुंबई पॅटर्नप्रमाणे शहरातील एका विशिष्ट मार्गावरच हेल्मेटसक्तीसाठी कारवाई केली जाणार असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती नागरिकांना दिली जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेसाठी वाहतूक पोलिस शाखेने जय्यत तयारी केली आहे.
अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी न्यायालयाने दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती केली आहे. मात्र, गेल्या सात-आठ महिन्यांपासून हेल्मेटसक्तीत शिथिलता आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीसाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहेत. दररोज सकाळी शहरातील एका विशिष्ट मार्गावर शहर वाहतूक पोलिस शाखेकडून हेल्मेटसक्तीची कारवाई करणार असून, त्याची माहिती ट्विटरवरून दिली जाणार आहे. सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ रात्री ७ पर्यंत ही विशेष कारवाई केली जाणार आहे.