भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या ; छगन भुजबळांची सभागृहात मागणी

छगन भुजबळ,www.pudhari.news
छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करून या ठिकाणी सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरू करण्यात यावी, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यासह लोक आंदोलनास बसले आहे. शासनाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता ताबडतोब भिडे वाड्याच्या स्मारकाचा निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेत आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम ९७ अन्वये स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, पुणे येथील भिडे वाडा हे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी दिवसभर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह अनेक नागरिक भिडे वाड्यासमोर उपोषणाला बसले आहे. बाबा आढाव यांच्या वयाचा विचार करता शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. भिडे वाडा येथे "सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा" सुरू करण्याचा शासनाने २७ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतलेला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा १ जाने. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यात सुरू केली आणि स्त्री शिक्षणाचे बीज रोवले.

ही ऐतिहासिक वास्तू पुणे महापालिकेने विहित पद्धतीने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी मनपाने २१ फेब्रुवारी २००६ रोजी ठराव क्र. ५५७ अन्वये ठराव मंजूर केलेला आहे. भिडे वाडयात पुणे महापालिकेतर्फे मुलींची शाळा सुरू करण्याचा २७ नोव्हेंबर २०२१ रोजी निर्णय घेतलेला आहे. महापालिकेने ही ऐतिहासिक वास्तू ताब्यात घेऊन या ठिकाणी मुलींची शाळा सुरू करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ म्हणाले.

तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेणार

उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरकार या प्रश्नावर गंभीर असून, भुजबळ यांनी या अगोदरदेखील या प्रश्नाबाबत चर्चा केली आहे. याबाबत आता तत्काळ बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच त्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार भुजबळ यांना दिले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news