धुळे; पुढारी वृत्तसेवा
एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने कापून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चार चोरट्यांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (Dhule LCB) यश आले आहे. या चोरट्यांकडून 3 लाखाच्या रोकडसह महेंद्र पिकअप वाहन आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आले. या चोरट्यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये अशा पद्धतीने चोरी केल्याची शक्यता असल्याचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील व अपर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन कापून, अज्ञात चोरट्यांनी 33 लाखाची चोरी केल्याची बाब निदर्शनास आली होती. ही घटना घडल्यानंतर 36 तासानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपास पथकातील सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, व बाळासाहेब सूर्यवंशी, तसेच श्रीकांत पाटील , प्रभाकर बैसाने आदींनी खबऱ्यांकडून याबाबतची माहिती प्राप्त केली. (Dhule LCB)
त्यानुसार चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला. त्यानंतर कॅमेराचे कनेक्शन तोडले. मात्र डीव्हीआर मध्ये चोरट्यांनी रेनकोट घालून डोक्यावर टोपी घातल्याचे आणि चेहऱ्यावर कापड बांधल्याचे दिसले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात अडचणी निर्माण झाल्या.
दरम्यान तपास पथकाने अधिक चौकशी केली असता, हे चोरटे नेवाली,खेतीया, शहादा दोंडाईचा मार्गे शिंदखेडा तालुक्यात आल्याचे आणि त्याच मार्गाने परत गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तपास पथक हरियाणा राज्यातील पलवल व नूहू या गावी जाऊन पोहोचले. त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आबिद उर्फ लंगडा उर्फ बकरा अब्दुल अहि, माहीर लियाकत अली या दोघांना ताब्यात घेऊन घटनेची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा अन्य पाच जणांच्या मदतीने केल्याची माहिती उघडकीस आली.
त्यानंतर या पथकाने मध्यप्रदेशातून ताहीर हुसेन इसरा खान आणि संतोष तुळशीराम जमरे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांचीही संयुक्त चौकशी केली. त्यामध्ये शिंदखेडा येथील एटीएम तोडल्याची माहिती पुढे आली. या चौघांकडून 3 लाखाच्या रोकड सह एच आर 61 ए 99 16 क्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडी तसेच एम पी 09 एम आर 6552 क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या चौघा चोरट्यांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अशाच पद्धतीने चोऱ्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी अटक करण्यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्ह्यात एका एटीएम ची संपूर्ण माहिती काढली होती. या एटीएम मशीनमध्ये ते चोरी करणार होते. तत्पुर्वी धुळे पोलिसांनी त्यांना गजाआड केल्याने हा गुन्हा झाला नाही.
हेही वाचा