नाशिक : मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणात आणखी एक ते दोन संशयितांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. संशयित संदीप वाजे याने डॉ. वाजे यांचा गळा दाबून व चिरून खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहासह कार इतर संशयितांनी जाळल्याचे समजते. त्यामुळे वाडीवर्हे पोलिसांनी त्या संशयिताचा शोध सुरू केला आहे.
कौटुंबिक कलहातून संदीप वाजे याने पत्नी डॉ. सुवर्णा यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संदीप याने पोलिसांना तपासात अपेक्षित सहकार्य केले नसल्याचे समजते. मात्र, या गुन्ह्यातील दुसरा संशयित बाळासाहेब म्हस्के यास अटक केल्यानंतर या गुन्ह्यातील इतर महत्त्वाची माहिती समोर आली. म्हस्के याने दिलेल्या कबुलीनुसार संदीप वाजेने पत्नीचा खून केला. त्यानंतर सॅनिटायझरचा वापर करून डॉ. वाजे यांच्यासह त्यांची कार जाळण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सॅनिटायझरची कॅन जप्त केली आहे. दरम्यान, डॉ. वाजे यांचा खून केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दुसर्या संशयितावर देण्यात आल्याचेही पोलिस तपासात समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या संशयितांचा शोध सुरू केला आहे.