

धुळे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्राने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून निर्घृण खून केला. ही घटना मंगळवारी (दि.८) शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन या गावात घडली. देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास विजय महाले याला शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली.
देविदास बहिरम हा तरूण झेंडे अंजन गावात राहत असून त्याचे गावातील मित्र विकास महाले याच्याबरोबर किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून राग अनावर झाल्याने विकास महाले याने देविदास याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. त्याला स्थानिक नागरिकांनी तातडीने उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विकास विजय महाले याला अटक केली.