Belgaum Murder Case | वकिलांकडून वकिलाचा खून

तीन वकिलांसह दहाजणांवर गुन्हा; आठ अटकेत, रायबाग तालुक्यातील घटना
Belgaum Murder Case
गणेशगुडी : जंगल परिसरात ज्या ठिकाणी खून करून मृतदेह टाकला होता तेथे संशयितांना नेऊन पंचनामा करताना पोलिस. (Pudhari File Photo)
Published on
Updated on

बेळगाव : मालमत्तेच्या वादातून वकिलांनीच वकिलाचे अपहरण करून खून केल्याची घटना रायबाग तालुक्यातील सवसुद्दी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एक ज्येष्ठ वकील, त्याचे दोघे सहायक वकील यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल केला. यापैकी आठजणांना अटक केली असून दोघे फरारी असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अ‍ॅड. संतोष अशोक पाटील (वय 32, रा. सवसुद्दी, ता. रायबाग) असे मृत वकिलाचे नाव आहे. याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये अ‍ॅड. शिवगौडा बसगौडा पाटील (47, सवसुद्दी, ता. रायबाग), अ‍ॅड. भरत कल्लाप्पा कोळी (वय 26, बस्तवाड, ता. रायबाग), अ‍ॅड. किरण वसंत केंपवाडे (27, बिरनाळ, ता. रायबाग) महावीर सुभाष हंजे (रा. अळगवाडी), सुरेश भीमाप्पा नंदी (19, (चंदूर, ता. बेळगाव), उदय भीमाप्पा मुसेन्नवर (23, गुजनाळ, ता. गोकाक), संजयकुमार यल्लाप्पा हळबन्नवर (27, वण्णूर, ता. बैलहोंगल), रामू भीमाप्पा दंडापुरे (33, गजमनाळ, ता. बैलहोंगल), मंजुनाथ बसवराज तळवार (23) व नागराज बसाप्पा नायक (दोघेही रा. होनीहाळ, ता. बेळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी महावीर हंजे व नागराज नायक हे फरारी असून उर्वरित 8 जणांना अटक केली आहे.

Belgaum Murder Case
Belgaum Division Protest | 31 डिसेंबरपूर्वी जिल्ह्याचे विभाजन करावे

डॉ. गुळेद म्हणाले, 29 एप्रिल रोजी रेखा संतोष पाटील (रा. सवसुद्दी, ता. रायबाग) यांनी रायबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. यामध्ये आपले पती अ‍ॅड. संतोष अशोक पाटील हे दुचाकीवरून रायबाग न्यायालयात जात होते. यावेळी त्यांचे अ‍ॅड. शिवगौडा बसगौडा पाटील व त्याचा ज्युनिअर वकील भरत कल्लाप्पा कोळी यांनी अपहरण केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी याची नोंद घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

खून करून मृतदेह जाळला

आपला अपहृत पती सापडत नसल्याचे सांगत पत्नीने याचा सातत्याने पाठपुरावा केला असता पोलिसांनी तपास गतीने सुरू केला. दीड महिन्यापूर्वी कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी जंगल परिसरात जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह ताब्यात घेऊन याची डीएनए चाचणी केली असता तो अ‍ॅड. संतोष पाटील यांचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला.

Belgaum Murder Case
Belgaum Mayor Controversy | स्थगिती पत्र नाही; तरीही महापौर पुन्हा रुजू

तलवारीने वार, पेट्रोलने पेटवले

अ‍ॅड. संतोष पाटील व संशयित अ‍ॅड. शिवगौडा पाटील यांच्यात 1 एकर 4 गुंठे शेतजमिनीचा वाद सुरू होता. हा वाद विकोपाला जाऊन अ‍ॅड. संतोष पाटील यांनी अ‍ॅड. शिवगौडा पाटील याच्याविरोधात रायबाग न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. त्यामुळे चिडलेल्या शिवगौडा याने आपल्या दोघा ज्युनिअर वकिलांना सोबत घेऊन खुनाचा कट रचला. यानंतर या खुनाची सुपारी अन्य सात जणांना दिली. ज्या दिवशी अ‍ॅड. संतोष पाटील बेपत्ता झाले त्याच दिवशी त्यांचे सवसुद्दीहून रायबागला दुचाकीवरून जाताना रस्त्यात कार आडवी लावत अपहरण करून कारमध्ये घातले. येथून त्यांना गणेशगुडी (ता. जोयडा, जि. कारवार) येथे नेले. तेथे नेऊन त्यांच्या डोकीत तलवारीने वार करून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल ओतून मृतदेह जाळून तो जंगल भागात फेकून दिला. अथणीचे उपअधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रायबागचे निरीक्षक बाळाप्पा मंटूर, उपनिरीक्षक शंकर मुकरी व त्यांच्या सहकार्‍यांनी याचा शोध घेतला.

खुनामागील नेमके सत्य

मृत संतोष पाटील याचा भाऊ लक्ष्मण पाटील हादेखील वकील होता. तो शिवगौडा पाटील याचा ज्युनिअर म्हणून काम करत होता. शिवगौडा हा वादात असलेली मालमत्ता शोधून ती संबंधितांना मिळवून देण्याचे काम करत असे. अशीच एक शेतजमीन त्याने आपला ज्युनिअर असलेला व मृत संतोष पाटीलचा भाऊ लक्ष्मण याच्या नावे केली होती. परंतु, अ‍ॅड. लक्ष्मण पाटील याचा कोरोना काळात अचानक मृत्यू झाला. ही मालमत्ता आपल्या भावाच्या नावे असून ती आपल्या कुटुंबाला मिळावी, यासाठी संतोष पाटीलने न्यायालयात दावा दाखल केला होता. मालमत्ता आपली असताना त्यावर संतोष पाटील हा दावा करत असल्याचा राग अ‍ॅड. शिवगौडा याला होता. त्यांच्या घरात हा एकटाच हुशार आहे, याला संपवले तर आपली मालमत्ता आपल्याला मिळेल, यातूनच शिवगौडाने या खुनाचा कट रचला आणि यात तो स्वतःच सापडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news