

All five accused in Mukundwadi murder case arrested
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडीत चिकन शॉपसमोर दुकानातील सुरा घेऊन पाच जणांनी तिघांवर सपासप वार करून एकाचा निघृण खून केला होता. मात्र तांत्रिक मुद्द्द्यावर त्यांना जामीन मिळाला होता. मात्र पोलिसांनी साताऱ्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात लगेच त्या पाचही आरोपींना अटक केली होती. मात्र खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पुन्हा सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अखेर न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा अटक करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी आरोपींना १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मस्तान ऊर्फ नन्ना कुरेशी (२९, रा. मुकुंदवाडी), समीर ऊर्फ सरफराज खान सरताज खान (२७, रा. मिसारवाडी), बाबर शेख अफसर शेख (३२, रा. मच्छी मार्केट, मुकुंदवाडी), साजिद ऊर्फ सज्जू अहेमद कुरेशी (२९, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) आणि नासीर खान मोहम्मद खान (२०, रा. कुरेशी चिकन शॉप, मुकुंदवाडी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी सोमनाथ ऊर्फ दत्ता जाधव व त्याचे मित्र नितीन आणि सचिन संकपाळ या भावंडांसोबत तो १९ जून २०२५ रोजी दुपारी रायगड हॉटेलवर जेवणासाठी गेला होता. रात्री पावणेआठच्या सुमारास हॉटेलबाहेर येताच ५ ते ६ इसमांनी त्यांच्यावर कोयते व चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला.
या भयानक हल्ल्यात नितीन संकपाळचा मृत्यू झाला, तर सचिन आणि सोमनाथ गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाच आरोपींसह एका अल्पवयीनला २० जूनला सकाळी ताब्यात घेतले.
पाच आरोपींना अटकेची लेखी कारणे दिली नसल्याच्या तांत्रिक कारणावरून न्यायालयाने आरोपींना तात्काळ जामीन मंजूर केला होता. मात्र सातारा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात पाचही सराईत आरोपींना पोलिसांनी अटक करून पोलिस कोठडी घेतली होती. त्यानंतर ते सध्या हर्मूल जेलमध्ये होते. न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी पाचही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात पुन्हा अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.
पुन्हा अटकेसाठी तातडीने उपाययोजना तांत्रिक अडचणीमुळे तपास प्रभावित होऊ नये यासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी खंडपीठाचे मुख्य शासकीय अभियोक्ता अॅड. अमरजितसिंह गिरासे व जिल्हा सरकारी वकील अॅड. अविनाश देशपांडे यांच्याशी तातडीने चर्चा करून कायदेशीर उपाययोजनाबाबत निर्णय घेतले. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा अटकेसाठी अर्ज दाखल केला. ३ जुलैला ती याचिका मंजूर झाल्यावर ४ जुलै रोजी आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली. अशा प्रकारे आरोपींना जामीन मिळण्याची ही शहरातील पहिलीच घटना होती.
पाचही आरोपींविरोधात यापूर्वी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बाबर शेखविरुद्ध पाचोड व सातारा पोलिस ठाण्यात तसेच मस्तान ऊर्फ नन्ना कुरेशी विरुद्ध मुकुंदवाडी व सातारा, नासीर खान विरुद्ध एमआयडीसी सिडको व सातारा तर समीर ऊर्फ सरफराज खान आणि साजिद ऊर्फ सज्जू कुरेशी विरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.