Dhule Jamphal PDN scheme Shindkheda| पिढ्यान्पिढ्यांचा दुष्काळ संपला! तापी नदीचे पाणी पोहोचणार शिंदखेड्याच्या शिवारात

जामफळ पीडीएन योजनेच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ; 54 गावांतील शेतीला मिळणार शाश्वत सिंचनाचे बळ-पालकमंत्री जयकुमार रावल
Dhule Jamphal PDN scheme Shindkheda
Dhule Jamphal PDN scheme Shindkheda
Published on: 
Updated on: 

धुळे : पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे. वर्षानुवर्षे पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत तापी नदीचे पाणी पोहोचविण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या (पीडीएन) मुख्य पाइपलाइन जोडणी कामाचा प्रारंभ करण्यात आला.

या योजनेमुळे 54 गावांच्या शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळणार आहे. शिंदखेडा तालुक्याच्या माथ्यावर असलेला दुष्काळाचा शिक्का कायमचा पुसून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचा आपला संकल्प असल्याचे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

जामफळ धरण येथे पीडीएन योजनेच्या मुख्य पाईपलाईन सुभाष भामरे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, खलाण्याचे माजी जि.प. सदस्य पंकज कदम, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता संदीप पवार, स्वप्नील गांगुर्डे, विशाल खैरनार, केतन भोसले, अमरदीप पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले, शिंदखेडा तालुक्याच्या एका बाजूला बारमाही वाहणारी तापी नदी असतानाही अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागला. पाऊस झाला तर पीक, अन्यथा नुकसान, अशी परिस्थिती बदलण्यासाठी तापी नदीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. दुष्काळावर तात्पुरती मदत नव्हे, तर कायमस्वरूपी सिंचन हाच खरा उपाय आहे. शेतकऱ्यांना वर्षभर शेती करता यावी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

सुलवाडे-जामफळ प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सन 2014 नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा करण्यात आला. जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीसाठी 1,058 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या प्रणालीद्वारे 54 गावांमधील 26,907 हेक्टर लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

एकूण 766.164 किलोमीटर पाइपलाइनपैकी 548.81 किलोमीटर पाईपचा पुरवठा झाला आहे. 324.93 किलोमीटर पाईपलाईन अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार पाईपलाईन अंथरण्याची प्रगती 42.41 टक्के आहे. प्रकल्पातील पाच रेल्वे आणि तीन राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंगपैकी दाबली, मेलाणे व माळीच येथील रेल्वे क्रॉसिंगची कामे पूर्ण झाली आहेत. होळ येथील काम अंतिम टप्प्यात आहे.

सुलवाडे-जामफळ मुख्य प्रकल्पाचे सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना लवकर सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी मुख्य पाइपलाइन जोडणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे 1 टीएमसी म्हणजेच 28.32 दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. जून 2027 पासून टप्प्याटप्प्याने सिंचनाचा लाभ देण्याचा प्रयत्न राहील. येत्या तीन ते चार महिन्यांत सुमारे 6 हजार हेक्टर क्षेत्रात पाणी वितरणाची व्यवस्था विकसित करण्याचे, तर पुढील टप्प्यात 13 ते 14 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

पारंपरिक कालव्यांऐवजी बंदिस्त पाईपलाइनमुळे पाण्याची गळती आणि अपव्यय कमी होणार आहे. या पाणीबचतीतून अतिरिक्त 2 हजार 700 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. आणखी पाच ते सहा गावांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. धरणातून गावापर्यंतच नव्हे, तर प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी सूक्ष्म सिंचन व्यवस्थेवरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाणी वितरणाच्या प्रभावी नियोजनासाठी 26,907 हेक्टर लाभक्षेत्राची दोन भागांत आणि सहा झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या भागात 13,500 हेक्टर, तर दुसऱ्या भागात 13,407 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. पाणी व्यवस्थापनासाठी 89 पाणी वापर संस्थांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यापैकी 23 संस्थांच्या इमारतींची कामे प्रगतूपथावर आहेत. शेतकऱ्यांनी या संस्थांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Dhule Jamphal PDN scheme Shindkheda
Dhule Jail Clashes | धुळे कारागृहात ताट धुण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी

पाईपलाईन टाकताना शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल, याची दक्षता घ्यावी. जमिनीशी संबंधित बाबींमध्ये नियमानुसार मोबदला देण्याची कार्यवाही करावी. प्रकल्पाची सर्व कामे समन्वयाने, गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Dhule Jamphal PDN scheme Shindkheda
Divyang School Recruitment Scam| नाशिक, धुळे अन् जळगावात दिव्यांग शाळांमध्ये बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उघडकीस!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news