

Dhule Central Jail Incident
धुळे : धुळे जिल्हा कारागृहातील बॅरक क्रमांक २ मध्ये जेवणानंतर ताट धुणे आणि हात धुण्याच्या जागेवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकारामुळे कारागृहातील शांतता आणि शिस्त भंग झाली. या प्रकरणी कारागृहातील तीन न्यायबंद्यांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे जिल्हा कारागृहातील बॅरक क्रमांक २ मध्ये न्यायबंदी जेवण करीत होते. जेवण झाल्यानंतर न्यायबंदी आकाश गजानन मरसाळे हा पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ आपले जेवणाचे ताट साफ करीत होता. त्याचवेळी न्यायबंदी शाहिद अब्दुल रऊफ शेख हा स्वच्छतागृहातून हात धुण्यासाठी तेथे आला. ताट धुणे आणि हात धुण्याच्या जागेवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
सुरुवातीला शाब्दिक स्वरूपात असलेल्या या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हातापाईत झाले. दरम्यान, बॅरकमधील अन्य न्यायबंदी सचिन ऊर्फ बब्या दौलत जाधव आणि आदित्य राजेंद्र मेढे यांनीही या वादात सहभाग घेतला. त्यांनी शाहिद शेख याच्याशी शाब्दिक वाद घालत भांडण सुरू केले. त्यामुळे बॅरकमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
बॅरकमध्ये तैनात असलेले तुरुंगशिपाई अजिंक्य फकिरा आहेरे यांनी गोंधळाचा आवाज ऐकून संबंधित न्यायबंद्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकारामुळे कारागृहातील शिस्त आणि शांततेचा भंग झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तुरुंगशिपाई अजिंक्य आहेरे यांच्या फिर्यादीवरून शाहिद अब्दुल रऊफ शेख, सचिन ऊर्फ बब्या दौलत जाधव आणि आदित्य राजेंद्र मेढे या तिघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार अतुल बागुल या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
धुळे कारागृहात यापूर्वीही न्यायबंद्यांमध्ये वादाचे प्रकार घडले आहेत. आता ताट धुणे आणि हात धुण्यासारख्या किरकोळ कारणावरून वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने कारागृहातील शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.