

Dhule news
पिंपळनेर : परीक्षाविधीन पोलीस उपविभागीय अधिकारी तथा साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी ओंकार गवळी यांनी पेट्रोलियम पदार्थांचा काळाबाजार करणाऱ्यांना मोठा हादरा दिला आहे. टँकरमधून होणारी डिझेल सदृश पदार्थांची तस्करी त्यांनी हाणून पाडली असून या कारवाईत सुमारे ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
टँकरमधून बेकायदेशीररीत्या डिझेल सदृश पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी ओंकार गवळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह हॉटेल काका का ढाबा समोर सापळा लावला. यावेळी रस्त्याच्याकडेला असलेल्या एका पत्र्याच्या शेडबाहेर जी.जे ए.टी ३२९९ या क्रमांकाचा टँकर संशयास्पदरित्या दिसून आल्याने पोलिसांनी टँकरची तपासणी केली.
टँकरमध्ये डिझेल सदृश पदार्थ मिळून आल्याने पोलिसांनी संबंधितांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना टँकरसह त्यातील ३० लाख रुपये किमतीचे बेकायदेशीर डिझेल सदृश पदार्थांचा साठा तसेच शेडमधील ड्रममधून ४०० लिटर डिझेल, प्लास्टिक पाईप, तोंडी नोझल, पोर्टेबल डिस्पेसिंग युनिट, प्लास्टिक माप असा एकूण ४८ लाख ५ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पीएसआय अशोक वळवी यांनी साक्री पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रप्रकाश विरेंद्रकुमार मिश्रा, रा. चकलालमन प्रयागराज, उत्तरप्रदेश, मोहम्मद अब्बास अल्ताफ अली, रा. ग्याणीपूर, सुलतानपूर, उत्तरप्रदेश, सचिन जीवन मुर्तडकर, रा. मिरच्या मारुती चौक ग.नं ५ धुळे, सलीम युसूफ खान, रा.बाडमेर, राजस्थान व टँकर मालक या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.