

धुळे : नागपूर-सुरत महामार्गावरील लोंढे नाल्याजवळ अपघात झाल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. मात्र आमदार राम भदाणे यांनी मध्यस्थी करून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीने गतिरोधक टाकण्याची सूचना केली. त्यामुळे नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आहे.
नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील लोंढे नाल्याजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या महामार्गावरून नियोजित कामासाठी जात असलेले धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांचे आंदोलन शांत केले आणि या ठिकाणी तात्काळ गतिरोधक टाकण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
आज लोंढे नाल्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महामार्ग अडवून धरला. आमदार भदाणे यांनी घटनास्थळी पोहोचताच रुग्णवाहिका उपलब्ध करून देत जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले.
त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना या ठिकाणी कायमस्वरूपी उपाय म्हणून गतिरोधक, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर बसविण्याच्या त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून या कामास तात्काळ मंजुरी देण्यास सांगितले. आमदार राम भदाणे यांच्या या तत्पर भूमिकेमुळे महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.