

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा – येथील हिंदळा शिवारात एकाच ठिकाणी क्षेत्र असलेल्या चार शेतकऱ्यांच्या चार हेक्टर 24 आर क्षेत्रातील डाळिंबबागा सोमवारी (ता. १८)दुपारी अचानक लागलेल्या आगीत खाक झाल्या. आग कशामुळे लागली हे समजले नसले तरी तळपत्या उन्हात आगीने रौद्ररूप धारण करत उभ्या डाळिंबबागा खाक झाल्या आहेत. चारही शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. यंदा विहिरींनी तळ गाठला असताना ठिबक सिंचनाद्वारे पाणी देत रात्रीचा दिवस करत जतन केलेल्या डाळिंबबागा भरदिवसा खाक झाल्याने शेतकरी कुटुंबे हतबल झाली आहेत.
येथील डोंगऱ्यादेवलगतच्या हिंदळा शिवारात लीलाबाई तुकाराम देवरे (गट क्रमांक 142/1-क्षेत्र 1.77 आर), भाऊसाहेब तुकाराम देवरे(गट क्रमांक 142/2अ क्षेत्र 0.77आर), ललेश रावसाहेब देवरे(गट क्रमांक 142/2 ब-क्षेत्र 1.00 आर),अशोक हिरालाल पाटील(गट क्रमांक क्षेत्र 0.70 आर)यांचे सुमारे चार हेक्टर 24 आर क्षेत्रात डाळिंब बागा उभ्या आहेत. सोमवारी आग लागल्याने डाळिंबाचे उभे क्षेत्र जळून खाक झाले. महसूल विभागास माहिती दिल्यावर तलाठी अमोल बोरसे, कोतवाल बापू अहिरे यांनी भेट देत पंचनामा केला. लीलाबाई देवरे यांचे एक लाख पंचाहत्तर हजार, भाऊसाहेब देवरे यांचे पंचाहत्तर हजार, ललेश देवरे यांचे एक लाख, तर अशोक पाटील यांचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पंचनाम्यात नमूद करण्यात आला आहे.रोहित संजय देवरे,देवेंद्र वसंत सोनार,संभाजी मोहिते,मेघराज अहिरे पंच म्हणून उपस्थित होते. तथापि, विहिरीना पाणीच नसल्याने जळालेली डाळिंबाची झाडे नवीन उभी राहणे अशक्य आहे.बागा काढून टाकण्याशिवाय गत्यंतर नसल्याच्या भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दुष्काळात तेरावा महिना
यंदा अत्यल्प पावसामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सर्वच ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. बहुतांश ठिकाणी तर शेतीसाठीच काय जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्याचे भयावह चित्र आहे. एकीकडे निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आहे. सत्तेवर असलेले लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या जुळवाजुळवीत व्यस्त आहेत. मग अशा वेळी शेतकऱ्यांचा वाली'कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जेमतेम पाण्यात रब्बी हंगामाची कसरत करावी लागली. दुसरीकडे उन्हाळी पिकांची कोणतीच श्वाश्वती नाही. यंदा तर बहुतेक ठिकाणी जनावरांना पाणी पाजता येईल इतका वेळ वीजपंप सुरू करणे शक्य होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. साक्री तालुक्यात अपवाद वगळता अशा प्रकल्पात जलसाठा आहे. दुसरीकडे लहानमोठी धरणे, पाझर तलाव ऐन पावसाळ्यातही कोरडेठाक होते. पूर्ण पावसाळा संपूनही नालाबांध देखील भरू शकले नाहीत. वनक्षेत्रातही पाण्याचा टिपूस नाही. उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाद्वारे बागा जतन केल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुसऱ्यांदा डाळिंबबाग खाक
गेल्या वर्षीही याच शिवारात स्मिता दीपक देवरे, दीपक तुकाराम देवरे व भाऊसाहेब तुकाराम देवरे यांच्या डाळिंबबागेत आग लागून मोठे नुकसान झाले होते. शिवाय दुभत्या जनावरांचा चाराही जळून खाक झाला होता. वर्ष संपूनही भरपाई न मिळता दुसऱ्यांदा संकट उभे ठाकले आहे. महसूल विभाग पंचनामा करूनही भरपाई मात्र मिळत नसल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत असल्याचा तीव्र संताप भाऊसाहेब देवरे यांनी 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा –