

अंबादास बेनुस्कर
पिंपळनेर : साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाने इतिहास घडविला आहे. पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान भाजपच्या डॉ.योगिता जितेश चौरे यांना मिळाला आहे.
त्यांना एकूण 7366 मते मिळाली.त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड यांचा 1366 मतांनी पराभव केला. तर सदस्य पदाच्या 18 जागांपैकी भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी 8-8 उमेदवार विजयी झाले असून दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली आहे.यातील एका अपक्ष उमदेवाराने भाजपाला पाठींबा जाहीर केल्याने भाजपाचा सत्तामार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान,निकालानंतर भाजप नेते माजी आ. कुणाल पाटलांच्या नेतृत्वात सर्व विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
पिंपळनेर ग्रामपंचायतीचे 100 वर्षांनंतर नगरपरिषदेत रुपांतर झाल्यानंतर या ठिकाणी प्रथमच सार्वत्रिक निवडणूक पार पडली.नगरपरिषदेवर पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्या पक्षालाच मिळावा,यासाठी शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित आणि भाजपाने स्वबळावर पुर्ण ताकद पणाला लावली होती.त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत भाजप व सेनेतच होती.तर सदस्य पदाच्या 18 जागांसाठी 64 उमेदवार रिंगणात होते. आज सकाळी 10 वाजेपासून पिंपळनेर येथील वीर भीमा नायक आयटीआय येथे मतमोजणीला सुरवात झाली.मतोजणीसाठी एकूण दहा टेबल लावण्यात आले होते. एकूण तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात आली.पहिला निकाल काय लागतो,याकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
पहिल्या फेरीपासूनच भाजपच्या डॉ.योगिता चौरे होत्या आघाडीवर!
आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली तेव्हा पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.योगिता जितेश चौरे यांनी आघाडी घेतली होती.ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत टिकली. मतमोजणी अखेरीस डॉ. योगिता चौरे यांना 7366 मते तर शिवसेनेच्या ललिता गायकवाड यांना 6045 मते मिळाली परिणामी,भाजप डॉ. योगिता चौरे ह्या 1321 मतांच्या आघाडीने विजयी झाल्या.काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा प्रकाश चौरे यांना अवधी 1008 मते मिळाली.तर राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय अशोक सोनवणे यांना केवळ 120 मते मिळू शकली.निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता शेजूळ व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीपक पाटील यांनी भाजपाच्या उमेदवार डॉ.योगिता चौरे यांना विजयी घोषित केले.त्यानंतर माजी आ. कुणाल पाटील यांनी विजयी उमेदवारांसोबत गुलाल उधळून जल्लोष केला.
भाजपाला सत्तेचा मार्ग मोकळा !
पिंपळनेर नगरपरिषदेच्या सदस्य पदाच्या एकूण 18 जागा होत्या.त्यापैकी भाजपा व शिवसेनेने प्रत्येकी 8 जागांवर विजय मिळवला.तर दोन अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत बाजी मारली.यात प्रभाग 5 बमधून डॉ.प्रशांत कांतीलाल बागुल यांनी तर प्रभाग 9 ब मधून विजय साहेबराव गांगुर्डे यांनी विजय संपादन केला विजयानंतर अपक्ष व उमेदवार डॉ.प्रशांत बागुल यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे नगरपरिषदेवर भाजपाच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पिंपळनेरसाठी स्वतंत्र पॅकेज मागणार!
पिंपळनेर नगर परिषदेसाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने परिश्रम घेतले,हा विजय त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली होती. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल,ज्येष्ठ नेते आमदार अमरीशभाई पटेल,माजी संरक्षण मंत्री डॉ.सुभाष भामरे,ज्येष्ठ नेते शिवाजीराव दहिते, जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, माजी जिल्हाध्यक्ष बबन चौधरी,माजी सभापती हर्षवर्धन दहिते,चंद्रजीत पाटील यांच्यासह भाजपाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करायचे असून विकासाचे नवीन पिंपळनेर आपल्याला घडवायचे आहे.पिंपळनेरच्या विकास कामांसाठी लवकरच स्वतंत्र पॅकेज मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी विजयाने हुरळून न जाता जबाबदारीने विकासासाठी काम करावे.
माजी आ.कुणाल पाटील,जिल्हा निवडणूक प्रमुख,भाजप ही ताकद आली कामी
डॉ.योगिता चौरे यांच्या रुपाने भाजपाला पहिले नगराध्यक्षपद मिळाले आहे.या विजयासाठी अनेकजण झटले आहेत. यापैकी माजी आमदार कुणाल पाटील यांनी मतदानाच्या आठ दिवस अगोदर पिंपळनेरचे वारे भाजपाच्या दिशेने वळविले.खुद्द डॉ.जितेश चौरे यांचेही सामाजिक कार्यही भाजपाच्या मदतीस धावून आले.डॉ. योगिता चौरे यांना पारिवारीक राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे सासरे जगदीश हरी चौरे हे जिल्हा परिषद सदस्य, सभापती होते. सन 2019 पासून डॉ. चौरे दाम्पत्य भाजपात सक्रीय झाले.अवघ्या काही महिन्यांतच त्यांनी पिंपळनेरात भाजपाचे मोठे कार्य उभे केले आहे. शिवाय डॉ.योगिता चौरे यांच्या उमेदवारीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही खंबीर पाठींबा मिळाला.ही सर्व ताकद डॉ.योगिता चौरेंच्या विजयाची शिल्पकार ठरली.
छाया:अंबादास बेनुस्कर