

Dhule excise department attack
धुळे : धुळे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर बनावट दारू तयार करणाऱ्या तस्करांनी हल्ला केला, ज्यात निरीक्षकासह चार जण जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या दरम्यान तस्करांनी एक गाडी घटनास्थळावरून पळवून नेली, ज्यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल असल्याचा संशय आहे.
महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता आणि नाताळ, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभाग अलर्ट मोडवर होते. आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाचे विभागीय उपायुक्त श्रीमती यु.आर. वर्मा, तसेच धुळे जिल्ह्याचे अधीक्षक स्वाती काकडे यांनी सर्व पथकांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या कारवाई दरम्यान निरीक्षक आर. आर. धनवटे यांनी मोहाडी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंप्री शिवारातील पत्री शेडमध्ये बनावट दारू तयार होत असल्याची माहिती मिळताच पथकासह छापा टाकला. छाप्यात देशी मद्य आणि बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त झाले.
तत्पूर्वी, स्थानिक अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जखमी केले. महिंद्रा पिकअप वाहन (एम एच 41एयु 6207) मध्ये अंदाजे 200 लिटर क्षमतेचे दोन निळे प्लास्टिक ड्रम स्पिरीटने भरलेले, रिकाम्या बाटल्या आणि इतर साहित्य घेऊन तस्कर पळून गेला. मोहाडी पोलीस स्टेशनने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
जखमी झालेल्या निरीक्षक आर. आर. धनवटे, दुय्यम निरीक्षक अमोद भडागे, जवान दारासिंग पावरा आणि सुरेश शिरसाळे यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावरून अंदाजे 5,71,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (ब, क, ड, ई, फ), 80, 81, 83, 90, 108 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.