धुळे : भगवान श्रीकृष्णाची तुला होत असताना एका तुलसी पत्राच्या वजनाचे देखील महत्त्व विशद केले आहे. त्याच प्रमाणे महिला शक्ती तुळशीचे पान असून ही शक्ती ज्याच्या पारड्यात जाईल, तेच पारडे जड राहणार आहे. सध्या ही शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात असल्याचा दावा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी केला आहे.
धुळे येथील साने गुरुजी मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज महिला मेळावा घेण्यात आला या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे, संपर्कप्रमुख सरिता कोल्हे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वंदना सातपुते ,जिल्हाप्रमुख मनोज मोरे व सतीश महाले, महानगरप्रमुख संजय वाल्हे व संजय गुजराती यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
या मेळाव्यात बोलत असताना उपसभापती गोऱ्हे यांनी सांगितले की, महिलांच्या खात्यात नियमितपणे दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहेत. यासाठी सरकारने 45 हजार कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. मात्र विरोधकांकडून सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एखाद्या सावत्र भावाप्रमाणे बहिणीला झालेला फायदा हा विरोधकांना सहन होत नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
भारतात महिला शक्तीचे मोठे महत्त्व आहे. पुराणात देखील महिला शक्ती ही महत्त्वाची असल्याचे आपल्याला दिसते. भगवान श्रीकृष्णाची तुला होत असताना एका पारड्यात तुळशीचे पत्र ठेवल्याबरोबर तुला पूर्ण झाली. याच प्रमाणे महिला शक्ती म्हणजे तुळशीपत्र असून त्यांची शक्ती ज्या पारड्यात जाईल, तेच पारडे जड राहणार आहे. आगामी काळात महिलांची ही शक्ती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याच पारड्यात राहणार असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला आहे.
सरकारने महिला सक्षमीकरणासाठी ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेला मिळणार आहे. मात्र महिलांनी देखील बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन या पैशांचा सदुपयोग केल्यास सक्षम समाज घडण्यासाठी मदत होऊ शकते. असेही त्यांनी स्पष्ट केले. ही योजना जाहीर झाल्यानंतर समाजकंटक प्रवृत्ती असणाऱ्या काही लोकांनी महिलांकडून खोटे फॉर्म भरून घेऊन योजना बदनाम करण्याच्या शक्यता लक्षात घेऊनच सरकारने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने महिलांकडून अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने सुरू केली आहे. राज्यातील अडीच कोटी महिलांना याचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून प्रयत्न सुरू आहे ,त्याचा महिलांनी लाभ घेतला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.