मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा भेट घेत बंद दाराआड चर्चा केल्याने दोघांच्या या भेटीत दडलंय काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोघांनीही चर्चेबाबत गुप्तता पाळली आहे, पण या भेटीत गौतम अदानी यांच्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासह महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे कळते. (Maharashtra politics)
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले असून या पार्श्वभूमीवर २२ जुलै रोजी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी आरक्षणाबरोबरच साखर कारखान्यांना थकहमी देताना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा शरद पवार यांनी उपस्थित केला होता. राज्य सरकारने या भेटीनंतर काही कारखान्यांना थकहमी दिली आहे. त्यातून शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कारखान्यांना कर्ज नाकारण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या भेटीत शरद पवारांनी ३ ऑगस्टला पुन्हा घेतलेल्या भेटीत अशोक पवारांच्या साखर कारखान्याचा मुद्दा उपस्थित केल्याची चर्चा आहे. या साखर कारखान्याला थकहमी देण्यास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचा ठाम विरोध आहे. (Maharashtra politics)
राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाचा सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होणार आहे; तर शिंदे यांच्या सेनेचा सामना लोकसभेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाशी होणार आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभव पत्करावा लागला होता. तत्कालीन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध फारसे चांगले नसल्याने शिंदे सेनेची अप्रत्यक्ष मदत राष्ट्रवादी पवार गटाच्या सुरेश म्हात्रे यांना झाल्याची चर्चा होती. अशीच काही गणिते विधानसभा निवडणुकीत जुळून आणली जाऊ शकतात. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत महायुती आणि महाविकास आघाडीत दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
याशिवाय गौतम अदानी यांचा धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेसचाही ठाम विरोध आहे. मात्र, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने या प्रकल्पाला विरोध केलेला नाही. पवार आणि अदानी यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. या भेटीत धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे ठाकरे गटात मात्र चिंता आहे. (Maharashtra politics)