

धुळे : शहरालगत लळींग घाटात मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातामध्ये सहा जण ठार तर 26 जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे महामार्गावरील रहदारी ठप्प झाली असून महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान या अपघातात मदत कार्य करणारा टोल कर्मचारी देखील ठार झाल्यामुळे संतप्त वातावरण तयार झाले आहे .
मुंबई आग्रा महामार्गावर भल्या पहाटे हा अपघात झाला आहे.लळींग घाटामध्ये रॉंग साईटने येणारा रेतीच्या डंपरने समोरासमोर एका ट्रकला धडक दिली. या अपघातात डंपर आणि ट्रकचा चालक गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्याने टोल वसुली नाक्यावरील रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाली. यातील कर्मचारी मदत कार्य करीत असतानाच भरधाव वेगाने येणारी आराम बस या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांवर जाऊन आदळली. त्यामुळे आराम बसच्या केबिनमध्ये बसलेले प्रवासी जागीच ठार झाले. या अपघातात तीनही वाहनांमधील सहा जण ठार झाले असून 26 जखमी झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले. वाहन चालक तसेच पोलीस पथकाने तातडीने मदत कार्य सुरू केले. आराम बस मधील जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे . मृत प्रवाशांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान मदत करणारा टोल कर्मचारी देखील या अपघातात ठार झाल्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी संताप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.