

Municipal Corporation's Reckless Towing Van Plows into Four Vehicles, Including Mango Vendor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात मनमानी, मुजोरी करत ठराविक ठिकाणी वाहनांची उचलेगिरी करत दंड वसुली करणाऱ्या मनपा नागरिक मित्र पथकाच्या बेफाम टोइंग व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आंबे विक्रेत्यासह इतर तीन वाहनांना उडविले. ही घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास एपीआय कॉर्नर ते गरवारे स्टेडियम रस्त्यावर घडली. भीषण अपघातात आंबे विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर जमाव आक्रमक झाल्याचे कळताच तिथे आणखी चार ते पाच टोइंग व्हॅनसह पथकाचे कर्मचारी दाखल झाले होते. मात्र जमावाचा चढलेला पारा पाहून पथकाची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, काही स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण दबल्याची चर्चा आहे. रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
प्रोझोन मॉल समोर आंबे विक्रेता लक्ष्मण भाऊसाहेब निकम (रा. जयभवानीनगर) हे रस्त्याच्या कडेला दुचाकीचे स्टँड लावून बसले होते. त्यांना ऑर्डर देण्यासाठी जायचे असल्याने महागडे आंबे दुचाकीवर ठेवलेले होते. यावेळी मागून आलेल्या मनपाच्या भरधाव टोइंग व्हॅनवरील चालकाचे (संतोष पवार) अचानक नियंत्रण सुटले.
या अनियंत्रित व्हॅनने थेट निकम यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. व्हॅनचा वेग इतका प्रचंड होता की, निकम यांना धडक दिल्यानंतरही ती थांबली नाही. पुढे जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या आणखी दोन कार आणि एका स्कूटीलाही या व्हॅनने उडवले. या थरारामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी लक्ष्मण निकम यांना उपचारासाठी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, चार टाके पडले आहेत. तसेच पायालाही मार लागला आहे.
पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत प्रकरण दाबले ?
अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण होते. यावेळी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली. नागरिक मित्र पथकाविरुद्ध अगोदरच रोष असलेला जमाव अधिकच आक्रमक झाला. त्यांच्या जोडीला काही स्थानिक पदाधिकारीही आले. मात्र, पोलिस ठाण्यात प्रकरण जाताच तिथे नुकसानभरपाई देण्याची मागणी करत काही पदाधिकऱ्यानी मध्यस्थी केली आणि हे संपूर्ण प्रकरण गुन्हा दाखल न करता दाबल्याची चर्चा आहे.