

वाळूज महानगर : एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला वाहनाची वाट पाहत बसलेल्या महिलांना चिरडल्याची घटना बुधवारी (दि. २९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आसेगाव-आंबेगाव रस्त्यावर घडली. या अपघातात कविता विक्रम जाधव (३०) या महिलेचा मृत्यू झाला, तर सरला नवनाथ सोत्रे (३५), रुख्मण भागीनाथ सोत्रे (४३), सरला एकनाथ सोत्रे (४०), रोहिणी सागर सोत्रे (३०) व हिराबाई रमेश कांबळे (४५, सर्व रा. आसेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) या पाच महिला गंभीर जखमी झाल्या.
आसेगाव येथील कविता जाधव, सरला सोत्रे, रुख्मण सोत्रे, सरला सोत्रे, रोहिणी सोत्रे व हिराबाई कांबळे या सहा महिला बुधवारी सकाळी मुंबई-नागपूर महामार्गालगत आसेगाव शिवारात एका शेतात कांदे काढण्यासाठी गेल्या होत्या.
सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या सर्व जणी घरी येण्यासाठी आंबेगाव-आसेगाव रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत बसल्या होत्या. यावेळी आसेगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या कार (एमएच १२ पीएच ८४३९) ने या महिलांना चिरडून कार रस्त्याच्या खाली उतरून उलटली. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
जखमींना घाटीत केले दाखल
अपघाताची माहिती मिळताच मनोज जाधव, अमोल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश जाधव, नवनाथ सोत्रे, किरण कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमी महिलांना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य ट्रस्टच्या रुग्णवाहिकेतून चालक अक्षय कातखडे याच्या मदतीने उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी कविता जाधव यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.