

धुळे : छतावरून पडल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या एकाला नरडाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. बहिणीला देण्यासाठी पैसे मागितले, या किरकोळ कारणावरून पतीने तिच्या डोक्यात लाकडी दांडका घालून खून केला. यानंतर त्याने खून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्राथमिक तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी हा प्रकार उघडकीस आणून या मारेकरी पतीला गजाआड केले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दसवेल येथे ही घटना घडली आहे. नरडाणा पोलीस ठाण्याला सुनिता भिल (वय 33) या छतावरून उतरत असताना पाय घसरून जमिनीवर पडल्या. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचे अवलोकन केले असता हा प्रकार वेगळाच असल्याचा संशय त्यांना आला. त्यामुळे त्यांनी उदय भिल याची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्याच्या बोलण्यात देखील विसंगती आढळल्याने हा प्रकार खुनाचाच असल्याचा संशय मोरे यांना बळावला.
त्यांनी पॉलिसी खाक्या दाखवून चौकशी करताच खरा प्रकार समोर आला. मयत सुनिता भिल या उदय भिल यांच्याकडे बाराशे रुपयांची मागणी करत होत्या .हे पैसे त्यांना त्यांच्या बहिणीला द्यायचे होते. वारंवार होणाऱ्या या पैशाच्या मागणीमुळे उदय याला राग आला. त्याने जवळ पडलेले दांडके सरळ सुनीता यांच्या डोक्यात हाणले. हा घाव वर्मी बसल्याने त्या जागीच कोसळल्या .
सुनिता भिल या मारहाणीत मृत झाल्याचे निदर्शनास आल्याने उदय भिल याने हा खून लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने सुनिता या छतावरून पडल्याचा बनाव निर्माण करून पोलिसांना तशी माहिती दिली. मात्र प्राथमिक तपास करत असताना घटनास्थळावरील परिस्थिती आणि प्रत्यक्षदर्शी चौकशीतून निदर्शनात आलेली विसंगती यामुळे हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. या प्रकरणात आता उदय भिल याला अटक करण्यात आली आहे.