

धुळे : प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यातील लौकी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत लाभवाटप शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरास गटविकास अधिकारी प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वनक्षेत्रपाल, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेंद्र माळी होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, प्रधानमंत्री धरती आबा अभियानामुळे आदिवासी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक सर्वांगीण विकास साधता येणार आहे. या शिबिरात आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, घरकुल मंजुरीचे प्रमाणपत्र आदींचे वितरण करण्यात आले. तसेच विविध योजनांच्या माध्यमातून लाभांचे वाटपही करण्यात आले. सहायक प्रकल्प अधिकारी मनीष पाटकरी यांनी प्रास्ताविक केले तसेच आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली.