

धुळे : देशात आणीबाणी लागू झाल्याला बुधवार (दि.25) रोजी आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने धुळे जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले यांच्यासह संघर्षयात्री व त्यांचे कुटुंबीय आणि वारस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघर्षयात्रींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने भरवण्यात आलेल्या आणीबाणीवरील सचित्र प्रदर्शनाची पाहणीही मान्यवरांनी केली.
कार्यक्रमाप्रसंगी मदनलाल मिश्रा, रविंद्र बेलपाठक आदींनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आभार मानले.
केंद्र शासनाने तयार केलेली आणीबाणीवरील माहितीपट यावेळी दाखविण्यात आली. तसेच १९७५ ते १९७७ दरम्यानच्या घटनांवर आधारित प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील माहिती व जनसंपर्क भवन येथे नागरिकांसाठी खुले राहणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विसपुते व जिल्हा माहिती अधिकारी बोडके यांनी केले आहे.
सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध संघर्षयात्री उपस्थित होते. त्यांच्या सोयीचा विचार करून जिल्हाधिकारी विसपुते यांनी स्वतः त्यांच्या जागी जाऊन त्यांचा सन्मान केला. या संवेदनशीलतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप गावित, बंडू चौरे, चैतन्य मोरे, इस्माईल मनियार, ऋषिकेश येवले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मदनलाल जमनालाल मिश्रा, भिमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फ विजय शांताराम पाच्छापुरकर, यादवराव शामराव पाटील (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा (प्रतिनिधी), हरसिंग गोरखसिंग जमादार (गिरासे), शशिकांत रनाळकर (प्रतिनिधी), रविंद्र बेलपाठक, रेणुका बेलपाठक, शेखर वसंत चंद्रात्रे (प्रतिनिधी), भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉ. भूपेंद्र शहा, शीला सत्यानारायण अग्रवाल, मंजुळाबाई श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शहा, पुष्पा सुभाष शर्मा, प्रविण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक मराठे, शशिकला देविदास शार्दुल, रविंद्र वामन सोनवणे, भिकुबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतलाबाई जुगलकिशोर अग्रवाल.