

धुळे: गुगल मॅपच्या माध्यमातून पत्ता शोधण्याचा प्रकार एका कारचालकाला चांगलाच महागात पडला आहे. धुळ्यातील जमनागिरी परिसरातील तुटलेल्या पाईप मोरीच्या पुलावर ही कार अडकली. सुदैवाने कोणताही मोठा अनर्थ घडला नाही. ऐनवेळी चालकाने शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मदतीसाठी संपर्क केला. यानंतर ही कार स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. मात्र आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या धोकादायक पाईप मोरीजवळ आंदोलन करून नव्याने पूल उभारण्याची मागणी केली आहे.
दिवाळीच्या सणाच्या वेळी धुळ्यात नातेवाईकांकडे दिवाळी सणासाठी आलेले नाशिक येथील दिपक पाटील यांनी जमनागिरी परिसरातून साक्री रोडला जाण्यासाठी रात्रीच्या वेळी गुगल मॅपची मदत घेतली.त्यांना मॅपवर हा रस्ता दाखवण्यात आला. पण रस्ता माहित नसल्याने आणि गाडीचा स्पीड असल्याने फरशी पुलावर वाहून गेलेल्या ठिकाणी त्यांची कार अर्धवट अडकली. अशावेळी त्यांनी या भागातील त्यांच्या ओळखीचे शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांना संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली. धीरज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक युवकांना बोलून घटनास्थळावरून त्यांची कार अडकलेल्या ठिकाणाहून काढली, त्यामुळे संपूर्ण कुटुंब अपघातापासून बचावले, ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्यामुळे कुटुंब चांगलेच धास्तावले होते, पण मिळालेल्या मदतीमुळे कुटुंबीयांनी धीरज पाटील यांचे आभार मानत पुढील ठिकाणी ते मार्गस्थ झाले.
या फरशी पुलाची अवस्था पाहून शिवसेनेने या ठिकाणी आज जोरदार आंदोलन करीत धुळे महानगरपालिका आयुक्त यांना तातडीने या फरशी पुलाची दुरुस्ती नव्याने करण्याऐवजी या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी केली आहे. या फरशी पुलावर शिवसेना उबाठा वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना धीरज पाटील यांनी सांगितले की, धुळे शहरातील शनिनगर ते जमनागिरी रोड यांना जोडणारा मोती नाला वरील खुप वर्षांपासून खराब झालेला फरशी पुल यंदाच्या पावसाळ्यात अर्ध्याच्या वर वाहुन गेला. असे असताना महानगरपालिका व या स्थानिक भागाचे माजी लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे या भागात राहणारी गोरगरीब मोलमजुरी करणारे मजूर यांना जिव मुठीत धरून पुलाचा वापर करावा लागत होता. गेल्या वर्षी देखील फरशी पुलाची उंची कमी असल्यामुळे हा पुल अर्धवट वाहून गेला होता. त्यावेळी देखील शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने या ठिकाणी नव्याने पुल मंजूर करण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने फक्त पुलाची डागडुजी करून पुल वाहतुकीसाठी खुला ठेवला .
फाशी फुलाकडून जमना गिरी रोड मार्गे साक्री रोडाकडे जाण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग असल्याने या पुलाचा नेहमी वापर केला जातो मात्र आता पूल धोकादायक स्थितीमुळे आला असल्याने शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा उचलल्याची माहिती यावेळी धीरज पाटील यांनी दिली. याप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील ,विधानसभा क्षेत्र प्रमुख भरत मोरे, प्रशांत ठाकूर कपिल लिंगायत ,अरुण पाटील, सुरज भावसार, तेजस सपकाळ, मोनु शिकलकर यांच्या सह स्थानिक नागरिक उपस्थित होते. महानगरपालिका आयुक्तांनी या संदर्भात युद्धपातळीवर नवीन पुला संदर्भात येत्या आठ दिवसात निविदा प्रकाशित करण्यात येईल अशा आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले आहे.