

Bhudargad Local Body Election
रविराज वि. पाटील
गारगोटी : दिवाळीचा गोडवा ओसरताच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने भुदरगड तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे, तर तालुक्यात शिवसेनेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा गट सर्वाधिक प्रबळ मानला जात असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भुदरगड तालुक्यात सध्या अनेक प्रभावी राजकीय गट सक्रिय आहेत. शिवसेनेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे राहुल देसाई - सत्यजित जाधव हे प्रमुख गट मानले जातात. त्याचवेळी भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि मनसे या गटांना अस्तित्व टिकवण्यासाठी झगडावे लागत आहे. गत निवडणुकीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर - माजी
काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. दुसरीकडे, माजी आमदार के. पी. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश केल्याने त्यांच्यासमोर महत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. जुन्या महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांसोबत राहायचे की सत्ताधारी महायुतीसोबत हातमिळवणी करायची, या द्विधावस्थेत त्यांचा गट सापडलेला दिसतो. प्रमुख नेतेमंडळींनी अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे.
आमदार जाधव विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील - राहुल देसाई, भाजप अशी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या असून, नवीन समीकरणे तयार झाली आहेत.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गेल्या काही वर्षांत तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. प्रलंबित प्रश्नांची केलेली सोडवणूक आणि मजबूत संघटन या जोरावर आपले वर्चस्व अधिक घट्ट केले आहे. विधानसभेची सलग तिसरी निवडणूक जिंकून राधानगरी मतदारसंघात 'हॅट्ट्रिक' साधणारे आणि कॅबिनेट मंत्रिपद, पालकमंत्रिपद मिळवणारे ते पहिलेच आमदार ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या गटाचे भुदरगड तालुक्यातील राजकारणात वर्चस्व अधिकच वाढले असल्याने या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.