गिरीश महाजनांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही : आमदार रोहित पवार

गिरीश महाजनांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही : आमदार रोहित पवार

धुळे : पुढारी वृत्तसेवा

कापसाच्या दरासाठी आंदोलन करणारे ना. गिरीश महाजन सत्तेत आल्यानंतर त्यांना कापसाच्या दरासंदर्भात काहीही घेणे-देणे नाही. धुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन कुठे आहेत, असा प्रश्नदेखील आमदार रोहित पवार यांनी धुळ्यात उपस्थित केला आहे.

धुळे येथील सैनिक लॉनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. मेळाव्याला महिला आघाडीच्या विद्या चव्हाण तसेच आमदार सुनील भुसारा, जयदेव गायकवाड, रविकांत वर्पे, राजापूरकर यांच्यासह धुळ्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारुडे, संदीप बेडसे उपस्थित होते.

धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 720 पदाधिकारी असून, त्यातून केवळ १८ जण फुटले असून, ते केवळ कॉन्ट्रॅक्ट आणि बदलीची कामे करीत होते, असा आरोप केला. याच वाक्याला धरून आमदार रोहित पवार यांनी फुटीर गटावर निशाणा साधला. धुळ्यातील फुटीर नेते हे केवळ उखळ पांढरे करण्याकरिता मुंबई वारी करत असल्याचा गौप्यस्फोट करताना महाजन यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. जिल्ह्यात दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून पिके गेली आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, गुरांच्या चाऱ्याचादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. गिरीश महाजन अशा स्थितीत कोठे आहेत. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news