कल्याणच्या कुंभारवाड्यात लगबग; दहीहंडीसाठी गोविंदांना आकर्षित करणारी रंगबेरंगी मडकी तयार | पुढारी

कल्याणच्या कुंभारवाड्यात लगबग; दहीहंडीसाठी गोविंदांना आकर्षित करणारी रंगबेरंगी मडकी तयार

डोंबिवली; बजरंग वाळुंज : कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीनंतर दहीहंडी उत्सवावाचे साऱ्यांनाच वेध लागलेले असतात. यंदा दहीहंडीनंतर नवरात्रौत्सव येत असल्याने मडक्यांना मोठी मागणी असते. या दोन्ही सणांसाठी मडक्यांचे दर यंदा २० रुपयांनी वाढले आहेत. दहीहंडीसाठी गोविंदांना आकर्षित करण्यासाठी रंगबेरंगी आकर्षीत मडकी बनण्यास तयारी कल्याणच्या कुंभारवाड्यात दिसून येते. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळानंतर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मडक्यांचा व्यवसाय तेजीत आल्याचे दिसून येत आहे.

कल्याण शहराला हजारो वर्षांपासूनचा इतिहास आहे. आचार्य अत्रे रंग मंदिराच्या परिसरात पूर्वी कल्याण गाव होते. त्यावेळी तेथे वाड्या देखील होत्या. फिरत्या चाकावर मातीला सुबक आकार देऊन सुबक भांडी तयार करणाऱ्या कुंभारांची कुंभारवाडी देखील होती. कालांतराने सर्व वाडीचे रूपांतर वाड्यात झाले. आताही कुंभारवाड्यात राहणारे रहिवासी आपला परंपरागत व्यवसाय करत आहेत. दहीहंडीचे वेध लागल्याने या वाड्यात आता मडकी बनवण्याच्या कामाला वेग आला आहे. काळानुसार मडक्यावर आकर्षण असे रंग आणि नक्षीकाम सुद्धा केले जात आहे. जवळपास 3 वर्ष कोरोनाचा काळ होता. त्यानंतर यंदा या व्यवसायाला सुगीचे दिवस आल्याचे इथल्या दुकानदारांनी सांगीतले. 10 ते 20 रुपयांनी यंदा मडक्याचे दर वाढले आहेत.

दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या मडक्यांवर विविध रंगांच्या छटांची कलाकुसर करण्यासाठी कल्याणच्या कुंभरवाड्यात एकच लगबग असते. मडके बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू असते. एका दुकानातून जवळपास पाचशे ते सातशे मडके या दिवसांत विकले जातात.

दहीहंडीनंतर नवरात्रौत्सव येत आहेत. या काळात मडक्यांना मोठी मागणी असते. तर गणेशोत्सवातही येथील गणपतीच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे धनाजी कुंभार यांनी सांगितले.

Back to top button