

Delhi Student Agitation Echoes
धुळे : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धुळे शहरात विविध सामाजिक, विद्यार्थी आणि राजकीय संघटनांनी निदर्शने करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात सत्यशोधक विद्यार्थी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि इतर संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
आंदोलकांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करत त्यांच्या आंदोलनावरील कारवाईचाही निषेध नोंदविला.
यावेळी आंदोलकांनी विविध फलक आणि घोषणांद्वारे सरकारविरोधात भूमिका मांडली. वक्त्यांनी आरोप केला की, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असून, शिक्षण, बेरोजगारी, महागाई आणि महिलांच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनात काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, तेजस गोटे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, सिद्धार्थ जगदेव, प्रभादेवी परदेशी, बाबा हातेकर, पंकज गोरे, पंकज भारस्कर, हरिश्चंद्र लोंढे, एल. आर. राव, एस. यू. तायडे, तसेच सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे सिद्धांत बागुल, हर्ष मोरे, केतन निकम, निलीमा भामरे, मयुरी जाधव, श्वेता गवळे, निकिता गवळे, दीक्षा वेंदे, साधना वाघ, प्रसिका जगदेव, राज वाघ, दिनेश बैसाणे, धनंजय जगताप, सिद्धार्थ बैसाणे, राज पगारे, विश्वजित वाघ, हरिश वाघ, मनोज नगराळे, संदीप बोरसे, महेंद्र शिंदे, दीपक बैसाणे, अतुल बैसाणे, मनीष दामोदर, भूषण ब्राह्मणे, मधुकर थोरात आदी उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फेही स्वतंत्र धरणे आंदोलन करण्यात आले. टीईटी आणि नीट परीक्षांशी संबंधित गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच दिल्लीत सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविण्यात आल्याच्या घटनेचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वाल्मिक मराठे, निखिल वाघ, निखिल मोमया, सोनू गुजर, जयेश गायकवाड, सचिन मराठे, इकबाल भाई, राकेश पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.