

धुळे: शिंदखेडा शहरातील बुराई नदीलगतच्या नवापुल ते विहीर (रज्जाक नगर) परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्य आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत १.५० कोटी रुपये खर्चाच्या संरक्षण भिंतीचे, तसेच शहरातील १ कोटी रुपये खर्चाच्या सोलर स्ट्रीट लाईट प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिंदखेडा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष उदय देसले, सार्वजनिक बांधकाम सभापती मनोहर पाटील, आरोग्य सभापती संगीता भिल, पाणीपुरवठा सभापती पुनम मराठे, महिला व बालकल्याण सभापती आरेफाबी अबुतालीब कुरेशी, गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह नगरसेवक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नदीचे नैसर्गिक स्वरूप जपा: पालकमंत्री रावल यावेळी पालकमंत्री रावल म्हणाले की, "बुराई नदी ही शहराची नैसर्गिक संपत्ती असून तिचे जतन करणे आवश्यक आहे. संरक्षण भिंत उभारताना नदीचे मूळ स्वरूप जपले जावे. नागरिकांनी नदीपात्रात किंवा भिंतीच्या परिसरात अतिक्रमण करू नये, अन्यथा भविष्यात महापुरात या भिंतीलाही धोका निर्माण होऊ शकतो." तसेच, बुराई नदी बारमाही प्रवाही करण्यासाठी विविध उपाययोजनांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासकामे आणि नागरिकांची जबाबदारी
पावसाळ्यात पुराचे पाणी घरांमध्ये शिरत असल्याने ही संरक्षण भिंत स्थानिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. नदीकाठचा परिसर विकसित केल्यास तो भविष्यात पर्यटन आणि फिरण्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सोलर स्ट्रीट लाईटच्या संरक्षणाचे आवाहन करत, सार्वजनिक मालमत्तेची चोरी किंवा नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. डीपीडीसी निधीतून यापूर्वी करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत, आगामी काळातही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण माळी यांनी केले.