

SBI ATM Theft
धुळे : शिरपूर शहरातील अंबिका नगरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे एटीएम गॅस कटरच्या माध्यमातून कापून रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. चोरटे मध्य प्रदेशाच्या दिशेने गेल्याचा संशय असल्याने त्यांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पथक चोरट्यांच्या मागावर रवाना केले आहे. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एटीएमवर रखवालदार नसल्याने हा प्रकार पुन्हा घडला असल्याचे निदर्शनास आले असून एटीएमच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शिरपूर शहरातील अंबिका नगरामध्ये असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटर च्या माध्यमातून कापून पैसे लांबविण्याचा प्रकार आज निदर्शनास आला. ही घटना निदर्शनास येताच जागरूक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळविल्याने शिरपूर शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्या पाठोपाठ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार व अन्य पोलीस दल देखील घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, एटीएम सेंटरच्या बाहेर नोटांची काही बंडले आढळून आली आहे. तर एटीएम गॅस कटर च्या माध्यमातून कापल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास केला असता चोरटे कारने आले असल्याची बाब निदर्शनास आली असून हे चोरटे मध्य प्रदेशाच्या दिशेने पळून गेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिरपूर शहर असे दोन पोलीस पथक चोरट्यांच्या मागावर रवाना करण्यात आले आहेत.
दरम्यान, या एटीएम सेंटरवर देखील बँकेने कोणताही रखवालदार नियुक्त केला नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आधी रेकी करून नंतर पैशांवर हात साफ केल्याचे प्रथमदर्शी दिसून येते आहे. धुळे जिल्ह्यात यापूर्वी धुळे शहरालगत कुसुंबा तसेच मुंबई - आग्रा महामार्ग लगत अशाच प्रकारे एटीएमच्या चोऱ्या झाल्या आहेत. या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. मात्र, या सर्व चोऱ्यांमध्ये रखवालदार नसल्याची बाब तपासात पुढे आली आहे.
या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अनेक वेळेस संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बँकांना पत्र पाठवून रखवालदार नेमण्याची तसेच अन्य सुरक्षा व्यवस्थाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र बँकेच्या प्रशासनामध्ये असणारा हलगर्जीपणा कमी होत नसल्याची बाब दिसून येते आहे.