

विलास जाधव
जामखेड: धनगर समाजाला एस.टी. आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ जामखेड फाटा येथे आज बुधवारी (दि. १ ऑक्टो) चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या वेळेत झालेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जालना येथे १७ सप्टेंबर २०२५ पासून धनगर एस.टी. आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक बोराडे यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले. उपोषणामुळे बोराडे यांची तब्येत खालावल्याने धनगर समाज बांधव अधिक आक्रमक झाले आहेत.
सुमारे एक तास चाललेल्या या आंदोलनात हजारो धनगर समाज बांधवांनी महामार्गावर ठिय्या मांडला होता. या वेळी, "धनगर एस.टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे," "येळकोट येळकोट जय मल्हार," "धनगर एकजुटीचा विजय असो" आणि "या सरकारचे करायचं काय? खाली मुंडकं वर पाय!" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाला मराठा, मुस्लिम, माळी आणि इतर समाजाच्या नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला. एक तासानंतर महसूल मंडळ अधिकारी काटकर यांना धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंबड पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.