

Two-wheeler pickup accident; Woman killed
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तेलवाडी गावाजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास भरधाव पिकअपने दुचाकीला मागून धडक दिल्याने वीस वर्षीय विवाहिता जागीच ठार झाली. निकिता संदीप चव्हाण (२०, रा. तेलवाडी, ता. कन्नड) असे मृत महिलेचे नाव आहे.
निकीता चव्हाण पती संदीप चव्हाण (२५) यांच्या सोबत दुचाकीवरून (क्र. एम. एच-२० जी. यू.९६०५) कन्नडकडे जात होती. दरम्यान, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या केळी भरलेल्या पिकअप (क्र. एम. एच.-४ एच वाय.-६४५६) वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
धडकेमुळे निकिता चव्हाण रस्त्यावर पडली आणि गंभीर जखमांमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर पती संदीप चव्हाण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिस संजय आटोळे यांनी दिली आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने कन्नड पोलिस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच बीट जमादार संजय आटोळे आणि दिनेश खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी निकिताला ग्रामीण रुग्णालयात हलवले. तेथे वैद्यकीय अधिकारी श्रीमती पठारे यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.