

Sakri SBI Bank Passbook Printing Machine Defunct
अंबादास बेनस्कर
पिंपळनेर : साक्री येथील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन गेल्या आठवडाभरापासून बंद असल्याने ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक आणि सर्वसामान्य खातेदारांना आपल्या खात्यातील व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
साक्री शाखेशी तालुक्यातील अनेक गावांतील हजारो ग्राहक जोडलेले आहेत. मात्र, पासबुक प्रिंटिंगची सुविधा बंद असल्याने खात्यात जमा झालेली किंवा काढलेली रक्कम तपासणे अनेकांसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, काहीवेळा बँकेतील कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंगही उद्भवत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, मशीन बंद असताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. काही ग्राहकांना मोबाईल बँकिंग अॅपचा वापर करण्याचा सल्ला दिला जात असला, तरी ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाशी परिचित नसलेल्या ग्राहकांना त्याचा उपयोग करणे शक्य होत नाही.
"गेल्या अनेक दिवसांपासून मशीन बंद असल्याने खात्यात पैसे जमा झाले की नाही, याची माहिती मिळत नाही. मोबाईल अॅप वापरण्याचा सल्ला दिला जातो; मात्र प्रत्येकाला स्मार्टफोन किंवा त्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे बँकेने मशीन तातडीने दुरुस्त करावे किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी," अशी मागणी ज्येष्ठ ग्राहक लक्ष्मण अहिरराव यांनी केली.
ग्राहकांकडून ओले, फाटलेले किंवा पिन लावलेले पासबुक मशीनमध्ये टाकले जात असल्याने प्रिंटरमध्ये तांत्रिक बिघाड होतो. ग्राहकांनी पासबुक वापरताना आवश्यक काळजी घ्यावी. संबंधित मशीनची दुरुस्ती सुरू असून, लवकरच पासबुक प्रिंटिंगची सेवा पूर्ववत करण्यात येईल.
- अरुण कुमार, शाखा व्यवस्थापक