.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिंपळनेर, जि.धुळे : शहरातील आंबेडकर चौक परिसर व चांदतारा मोहल्ला भागातील दोन गटात काल रात्री मागील भांडणाच्या कारणावरुन तुफान दंगल उसळली. दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही गटातील जमावाने तलवार, कोयते, चाकुसह लाठ्या- काठ्यांचा सर्रास वापर करीत एकमेकांवर हल्ला चढविला. या दंगलीत पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. धुळ्याहूनही अधिकची कुमक मागविण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत स्वतः एसपी श्रीकांत धिवरे हे देखील रात्रीच साक्रीत दाखल झाले होते. याप्रकरणी परस्पर फिर्यादीवरुन 70 हून अधिक जणांवर दंगलीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी बंदोबस्त तैनात असून तणावपुर्ण शांतता आहे. दरम्यान, पोलिसांनी सहा संशयितांना रात्रीच ताब्यात घेतले असून उर्वरितांचा शोध सुरु आहे.
आंबेडकर चौक परिसरावर चांदतारा मोहल्ला परिसरातील काही तरूणांनी दगडफेक केली.
पहाता पहाता या ठिकाणी जमाव एकत्र झाल्याने टारगटांच्या या कृतीचे दंगलीत रूपांतर झाले.
रात्री 8 ते 9 वाजेच्या सुमारास दोन गटातील जमाव एकत्र आला.
या जमावाने हातात लाठ्या- काठ्या, तलवार, कोयते, चाकू घेत एकमेकांवर हल्ला चढविला.
या हल्ल्यात दोन जण जखमी झाले.
या दगडफेकीत एका मालवाहू रिक्षाचेही नुकसान झाले.
याप्रकरणी एका गटातील प्रेम घनशाम वाघ,(19),रा.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साक्री या तरूणाने साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील भांडणाची कुरापत काढून मुस्तफा पठाण, नदिम फिरोज शहा, मुस्तफा शेख, अरबाज इक्बाल तांबोळी, शमिर मिर्झा, नयीन जेमाल बेलदार, अली जाकीर शेख, लकी जाकीर शेख, रिजयान युसूफ पठाण, वसीम तांबोळी, सद्दाम(पुर्ण नाव निष्पन्न नाही), शोएब मुनाफ पठाण, सुलतान खाटीक, रईस रहिम बेलदार,अशफाक बेलदार, आरिफ शेख,जाकीर गफ्फुर शेख तसेच इतर 25 जण,सर्व रा.साक्री हे काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एकत्र आले व त्यांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या मारहाणीत मोठा भाऊ राज वाघ, जय मोरे, कपिल वाघ, विशाल खरे, वेदिका अहिरे हे गंभीर जखमी झाले. तसेच या मारहाणीत एका मालवाहतूक रिक्षावर दगडफेक झाल्याने रिक्षाचेही नुकसान झाले.
या फिर्यादीवरून साक्री पोलीस ठाण्यात वरील सर्व संशयितांवर भारतीय न्याय संहिता कलमा प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई प्रसाद रौंदळ करीत आहेत.
परस्पर फिर्यादीत अरबाज एकबाल तांबोळी या 20 वर्षीय तरूणाने म्हटले आहे की, काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास एवन नामक चिकन शॉप येथे झोपण्यासाठी गेलो असताना मागील भांडणाची कुरापत काढून कपील वाघ, राज वाघ, प्रदीप मोहिते, उमेश वाघ, अतुल वाघ, दश पाथरे, उदय मोरे, जय मोरे, बंटी चांभार, निखील गाँड, भैय्या टँकरवाला, गौतम आखाडे यांचेसह 15 ते 28 जण सर्व रा.आंबेडकर चौक यांनी हातात लाठ्या-काठ्या, तलवार, कोयते, चाकू घेवून हल्ला चढविला. दरम्यान, मित्रांनी या हल्लेखोरांपासून वाचवित साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.
या फिर्यादीची दखल घेत वरील सर्व संशयितांवर साक्री पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोनि हर्षवर्धन गवळी करीत आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर साक्री धुळे ग्रामीण उपविभागीय अधिकारी संजय बांबळे, साक्री पोलीस ठाण्याचे पोनि हर्षवर्धन गवळी यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांसह भेट देवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. घटनेचे गांभीर्य ओळखून धुळ्याहूनही पोलीस कुमक मागविण्यात आली होती. सध्या घटनास्थळावर बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे.
आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक श्रीराम पवार यांचेसह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी एसपी धिवरे यांनी घटनेची माहिती घेतल्यावर दोन्ही गटातील लोकांना शांततेचे आवाहन केले. हा वाद विसरून सर्वांनी बंधूभावाने रहायचे आहे. मागचा विषय उकरून काढायचा नाही. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहील अशी वर्तणूक करावयाची आहे, अशा शब्दात दोन्ही गटातील लोकांना समजवित शांततेचे आवाहन केले. दरम्यान, यासंदर्भात आज सायंकाळी दोन्ही गटातील लोकांना एकत्र बोलावून समेट घडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे.