

पिंपळनेर, जि.धुळे : वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यास गेलेल्या महिला वनपालावरच जमावाने हल्ला केल्याची घटना काल जांभोरा येथे घडली. या जमावाने वनपालाची कॉलर पकडली. तसेच गळा दाबण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी निजामपूर पोलिसांत जमावाविरूद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात वन परीक्षेत्राच्या वनपाल रोशनी भगवान पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्या वनपरीक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे यांच्यासह वन खात्यातील कर्मचारी असे जांभोरा गावातील भवानीमाता मंदिराजवळ अतिक्रमणासंबंधी चर्चा करण्यास गेले होते. त्यावेळी जांभोरा गावातील चुणीलाल (वारू)गोनू चौरे, गोपा सोनवणे, छोटीराम शंकर भिल, राजेंद्र धर्मा बागुल, धोंडू भिल, उत्तम लक्ष्मण बोरसे, शिवाअण्णा देसाई, रेशमाबाई चुणीलाल (वारू)चौरे, मीराबाई, सोनीबाई व इतर 10 ते 15 लोकांनी दांडगाई करत शासकीय कामात अडथळा आणला. 'तुझ्यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. असे बोलत रेशमाबाई चौरेने रोशनी पवार यांची शासकीय वर्दीची कॉलर पकडून मारहाण केली. यावेळी इतर महिला शिवीगाळ व धक्काबुक्की करत होते. तसेच रेशमाबाईने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. यासह हिला जिवंत सोडू नका अशी चिथावणीखोर धमकी दिली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात वरील संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कोळी करत आहेत.