

Dhule Crime action against criminals
धुळे - जबरी चोरी, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या साक्री तालुक्यातील जामदा परिसरातील २२ जणांच्या टोळीच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्याअन्वये कारवाई करण्याच्या प्रस्तावास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंजुरी दिली आहे.
साक्री तालुक्यातील जामदा येथे राहणाऱ्या इक्बाल जाकीट ऊर्फ जाकीर चव्हाण, या गुन्हेगारी टोळीच्या प्रमुखाच्या नेतृत्वाखाली नेहमी गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत होते. या अंतर्गत निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार निदर्शनास आला.
या गुन्हयात टोळीप्रमुख इक्बाल जाकीट ऊर्फ जाकीर चव्हाण (रा. जामदा, ता. साक्री) व त्याच्या नेतृत्वाखालील संघटित गुन्हेगारी संघटनेचे सक्रीय सदस्य मुकेश येंकी पवार, जॉनी संतोष भोसले, रोहित अमीर चव्हाण, भुऱ्या निला चव्हाण, प्रभु अरविंद भोसले, पनन ताराचंद पवार, आनंद ताराचंद पवार, परबत रविन पवार, पंकेश रोशन चव्हाण, सिध्दु भोसले , नितिन ऊर्फ गांगुली गंभीर चव्हाण, नवेश चित्त भोसले, सुनील भामसिंग पवार, कनेश निला भोसले, कुका थकारी चव्हाण, गौतम उमेश पवार, रितिक पवार, बल्लु भंगी चव्हाण, भैय्या पिस्टु चव्हाण, रशेल चव्हाण, कोहीनूर जनाबापू पवार वगैरे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मयुर साहेबराव भामरे यांनी या गुन्ह्याच्या तपासात आरोपी विरुद्ध दाखल गुन्ह्यांचे पूर्व अभिलेखाची तपासणी केली असता इक्बाल जाकीट ऊर्फ जाकीर चव्हाण याचे धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात विरुध्द जबरी चोरी, दरोडा सारखे एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच टोळी प्रमुखाचे इतर सहकारी यांच्या विरोधात देखील दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून गुन्ह्यांची कागदपत्रे व त्यातील पुरावे आणि अभिलेख तपासणी केली. गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १११ प्रमाणे वाढीव कलमाचा समावेश करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या समक्ष प्रस्ताव सादर करण्यात आला.
या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर प्रस्तावातील २२ जणांनी एकत्रितपणे प्रत्यक्षपणे टोळीच्या माध्यमातून आर्थिक लाभासह इतर लाभ संपादन करण्याच्या उद्देशाने हिंसाचार करुन, हिंसाचार करण्याचे भय दाखवून गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले.
त्यामुळे अशा प्रकारे होणाऱ्या संघटीत गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व टोळीचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक होते. त्यामुळे आरोपींविरुध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १११ हे वाढीव कलम लागू करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकरीता सपोनि मयुर भामरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.