

धुळे : तालुक्यातील नरव्हाळ येथील लघु बंधाऱ्यांसह वन विभागाच्या हद्दीतील पाझर तलाव, सिमेंट बंधारे व लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये साठलेला गाळ किती आहे, याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत माजी आमदार कुणाल पाटील यांनी वन विभागाच्या हद्दीतील गाळ काढण्याची मागणी केली. त्यानुसार धुळे तालुक्यातील पांझर तलावातून गाळ काढण्याच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. यामुळे परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याला मोठा फायदा होणार आहे.
बैठकीला प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवकर, विशेष कार्य अधिकारी उदय ढगे, धुळेचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे, उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
माजी आमदार कुणाल पाटील यांनी विशेषतः नरव्हाळ लघु बंधाऱ्याच्या गाळाबाबत लक्ष वेधले. या बंधाऱ्यामुळे 10 ते 12 गावांना पाणीपुरवठा होतो. मात्र गाळामुळे साठवण क्षमता कमी झाल्याने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. ग्रामपंचायत व शेतकरी गाळ काढण्यास तयार असूनही वन विभागाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी पाटील यांनी केली.
सांजोरी, अंचाडे, सडगाव, हडसूणे, अनकवाडी, पुरमेपाडा, चौगाव, उभंड, लळींग, दह्याणे, वजीरखेडे, सायने, पिंपरखेड, बुरझड, पाडळदे यांसह इतर गावांतील तलाव व बंधाऱ्यांतून शेतकऱ्यांना स्वखर्चाने गाळ काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही पाटील यांनी पत्राद्वारे केली.
वनमंत्री नाईक यांनी उपवनसंरक्षक नितीन कुमार सिंग यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये गाळाचे प्रमाण किती आहे, तसेच गाळ वनीकरण व शेतीसाठी कसा वापरता येईल, याचा तपशील असावा, असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच ‘जलयुक्त शिवार’ व ‘गाळमुक्त तलाव’ या योजनांचा वापर करणे, याबाबतही चर्चेत भर पडली.
गाळ काढल्यास तलावांची साठवण क्षमता वाढून पाणीटंचाईस लक्षणीय प्रमाणात मदत होईल, तसेच बागायती शेतीचे प्रमाणही वाढेल, असे मत माजी आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केले.