

धुळे : शहरासह जिल्ह्यातील प्रवाशांसाठी येथून मुंबई व पुण्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वेसेवा सुरू करण्याचे आश्वासन सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना दिले.
आमदार अग्रवाल यांनी आज मुंबई येथे सेंट्रल रेल्वेचे सरव्यवस्थापक धर्मवीर मीना, रेल्वेचे प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर, उपसरव्यवस्थापक के. के. मिश्रा आदी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत धुळे शहराच्या रेल्वेशी संबंधित विविष विषयांवर चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले. त्यावेळी सरव्यवस्थापक मीना यांनी आमदार अग्रवाल यांनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करत त्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
आमदार अग्रवाल म्हणाले की, सध्या धुळ्याहून सकाळी धुळे- दादर रेल्वेसेवा सुरू आहे. मात्र, पुण्यासाठी कुठलीही रेल्वेसेवा नाही. रात्रीच्या वेळी मुंबई व पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वेची सुविधा नसल्याने धुळे स्थानकातून मुंबई व पुणे या दोन्ही महानगरांसाठी रोज रात्री एसी कोचसह तातडीने रेल्वे सुरू करण्याची गरज व्यक्त केली. तसेच मुंबई व पुणे येथूनही धुळ्यासाठी रोज रात्री एसी कोचसह रेल्वे सुरू झाल्यास हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून, याद्वारे रेल्वेलाही मोठे उत्पन्न मिळू शकेल.
आमदार अग्रवाल यांनी धुळे शहरासाठीच्या रेल्वेशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या विषयावर रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, मुंबई- आग्रा महामार्गावर मालेगाव रोडवर एलीसी २२ या ठिकाणी धुळ्यात प्रवेश करताना रेल्वे क्रॉसिंग आहे. या महामार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे रेल्वे ये- जा करताना गेट बंद ठेवावे लागत असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. या रेल्वे क्रॉसिंगवर तातडीने उड्डाणपूल उभारण्याची मागणी त्यांनी केली.